अनेकांना न ‘लाभ’लेले ‘ते’ मंत्रालयातील दालन नव्या ‘सावजा’च्या प्रतिक्षेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी गुरुवारी संपन्न झाला. ठाकरे यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील सहा जणांनी त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य मंत्रालयातील कार्यालयांचा उद्या ताबा घेणार आहेत. मात्र, त्यापूर्वी मंत्रालयातील गमतीचा भाग म्हणून एक चर्चा आहे. ती म्हणजे सहाव्या मजल्यावरील दालन क्रमांक 602. मागील वीस वर्षात या दालनातील तब्बल आठ मंत्र्यांना घरी बसावे लागल्याचा इतिहास असून आता या दालनाला मंत्री म्हणून कोणते नवीन सावज मिळणार याची चर्चा आहे.

1999 मध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यावर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी याच दालनातून कारभार चालवला. मात्र, त्यांच्या तेलगी घोटाळ्याचा आरोप झाल्याने त्यांनी मंत्रीपद सोडावे लागले होते. राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील हे गृह तथा उपमुख्यमंत्री असताना 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला. त्यावळी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आर.आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. सरकारच्या अंतीम टप्प्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्याने त्यांनी संतापून राजीनामा दिला होता.

2014 मध्ये सत्तांतर झाल्यावर एकनाथ खडसे यांच्या वाट्याला हे दालन आले. दीड-दोन वर्षातच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले. खडसे यांच्यानंतर मंत्रीमंडळाच्या विस्तारात पांडुरंग फुंडकर कृषी मंत्री झाले आणि त्यांही याच दालनातून कारभार सुरू ठेवला. परंतू फुंडकर यांच्या दुर्देवी मृत्युनंतर दालन रिकामे झाले. फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. अनिल बोंडे कृषीमंत्री झाले. आणि अवघ्या तीन महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. असा नकारात्मक इतिहास असलेले हे दालन आता नव्या मंत्र्याच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

602 दालनातील दुर्दैवी मंत्री
छगन भुजबळ, आर.आर.पाटील, अजित पवार, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, डॉ. अनिल बोंडे, अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत

Visit : Policenama.com