पोलीस भरतीचा GR रद्द, HM अनिल देशमुख यांनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. पोलीस भरती 2021 साठी एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी गृहमंत्रालयाने 4 जानेवारी 2021 रोजी जीआर काढला होता. मात्र, आता काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

यासंदर्भात माहिती देताना अनिल देशमुख म्हणाले, राज्यात पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरु होत आहे. या पोलीस भरतीमध्ये ज्या एसईबीसीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी 4 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आलेला शासनादेश (GR) रद्द करुन शासनाने तो 23 डिसेंबर 2020 चा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या पद्धतीचं शुद्धिपत्रक सरकारकडून लवकरच काढण्यात येईल.

राज्यात पोलीस शिपाई भरतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य सरकारनं पोलीस भरतीची प्रक्रिया जाहीर केल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय कुठलीही भरती नको अशी विनंती करुन देखील राज्य सरकारने पोलीस भरती सुरु केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.