WB Election 2021 : अमित शाहांचा मोठा दावा, म्हणाले – ‘पहिल्या टप्प्यात 30 पैकी 26 जागांवर भाजपचा विजय होईल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 27) पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान मी भाजपाकडून पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी दोन्ही राज्यातील जनतेला धन्यवाद देतो, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपा विजयी होईल, असा विश्वास केला आहे. पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 30 जागांपैकी 26 पेक्षा जास्त जागांवर विजय होईल, असा दावा शाह यांनी केला आहे.

गृहमंत्री अमित शाह रविवारी (दि. 28) दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये 84 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान आणि आसामध्ये 79 टक्क्यांहून जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे येथील जनता उत्साहित आहे. पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 30 जागापैकी 26 पेक्षा जास्त जागावर भाजपचा विजय होईल. तर आसामध्ये 47 पैकी 37 पेक्षा जास्त जागा भाजपा जिंकेल असा दावा शाह यांनी केला आहे. तसेच आसाममध्ये काही वर्षांपूर्वी आणि पश्चिम बंगालची यापूर्वीची निवडणूक हिंसाचारासाठी ओळखली जात होती. मात्र, यंदा दोन्ही राज्यात शांततेत मतदान झाले. हे दोन्ही राज्यांसाठी शुभ संकेत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्या कथित ऑडियो क्लिपमुळे खळबळ माजली आहे. नंदीग्राम येथे ममता यांच्याविरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय असलेले प्रलय पाल यांना ममता यांनी फोन लावला व जिंकण्यास मदत करण्यासाठी मदत मागितल्याचा दावा भाजपने केला आहे.