रात्री झोपताना खोकला येतो का ? जाणून घ्या ‘हे’ 10 सोपे घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना रात्री झोपताना किंवा कोरड्या खोकल्याच्या त्रासाची समस्या उद्भवते. कोरड्या खोकल्यात कफ होत नाही. याचं कारण, थंडी, धूम्रापान, फुप्फुसाचे आजार, कॅन्सर किंवा अस्थमा असू शकतो. जर तुम्हाला सामान्य खोकला असेल तर तो घरगुती उपाय करूनही बरा होऊ शकतो. आज आपण असेच काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) गुळण्या – रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या खळखळून गुळण्या करा. यामुळं घशात जमा झालेला स्त्राव स्वच्छ होतो आणि खवखव कमी होते. यात मीठ टाकलं किंवा नाही टाकलं तरीही चालतं.

2) कोमट पाणी – रात्री झोपताना कोमट पाण्यानं भरलेला ग्लास जवळ ठेवा. खोकल्याची उबळ आली तर त्यातील 2 घोट पाणी प्या. यामुळं उबळ थांबते.

3) लवंग आणि मध – यासाठी 4-5 लवंगा तव्यावर भाजून घ्या. थोड्या गार झाल्यानंतर त्या कुटून घ्या आणि त्याची पूड तयार करा. एका वाटीत 3 चमचे शुद्ध मध घेऊन त्यात लवंगाच्या चूर्णाचं मिश्रण तयार करावं. हे चाटण दिवसभरात 2-3 वेळा आणि रात्री झोपताना घ्यावं.

4) धूम्रपान – जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते वेळीच बंद करा.

5) आहार – तळलेले पदार्थ, फरसाण , चिवडा, बाकरवडी असे कडक आणि तेलकट पदार्थ रात्री खाऊ नयेत. त्यांचा तवंग आणि पातळथर घशात राहतो आणि खवखव वाढते.

6) खोकल्यावरील गोळ्या – खोकला कमी होण्यासाठी मिळणाऱ्या, मेंथॉलयुक्त चघळून खाण्याच्या गोळ्या खाणं टाळावं. त्यानं घसा जास्त कोरडा पडतो आणि खवखव वाढते.

7) ज्येष्ठमध – किराणा मालाच्या दुकानात मिळणारा ज्येष्ठमध हा मसाल्याचा पदार्थ असतो. काडीच्या स्वरूपात मिळणारा ज्येष्ठमध रात्री चघळत राहिल्यास खोकल्याची उबळ कमी होण्यास मदत होते.

8) सुंठ साखर – सुंठीची पुड साखरेत एकत्र करू रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी.

9) चहा-कृष्ण तुळशीची 15-20 पानं, 5-6 लवंगा मिरीच दाणे, एक इंच लांब सुंठ एक जुडी गवती चहा, सुपारीच्या अर्ध्या खांडाएवढा गळाचा एक खडा हे सर्व बिनदुधाच्या म्हणजेच कोऱ्या चहात घालून रात्री प्यावं.

10) अडुळसा – अडुळशाच्या पानांचा काढा कोरड्या खोकल्यासाठी खूप उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा घ्यावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.