सोलापूरमध्ये हॉटेल मॅनेजरचा वस्तादकडून ठेचून निर्घृण खून

सोलापूर : पोलीसामा ऑनलाइन – कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना सोलापूर शहर हत्याकांडाने हादरुन गेलं आहे. एका हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात भला मोठा दगड घालून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊन काळात घडलेल्या या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून हॉटेल मॅनेजरचा निर्घृण खून करण्यात आला आहे.

कैलास परबळकर असं खून झालेल्या मॅनेजरचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून कैलास मॅनेजर म्हणून कार्यरत होता. हॉटेलचा वस्ताद आकाश मंडल याच्यावर खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेनंतर आकाश मंडल फरार झाला आहे. हिप्परगा गावाजवळील सौरभ हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. संशयित आरोपी आकाश मंडल हा हॉटेलचा वस्ताद होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मंडल हा मुळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षापासून तो हॉटेलमध्ये कामाला होता. शनिवारी रात्री मॅनेजर कैलास आणि वस्ताद आकाश हे दोघे हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच संशयित आरोपी असलेल्या वस्ताद आकाशने मॅनेजर कैलासच्या डोक्यात भला मोठा दगड घालून आणि चेहरा ठेचून त्याचा निर्घृण खून केला, असा संशय हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे. तसेच हॉटेलमधील तीस-पस्तीस हजाराची रोकड, आधार कार्ड व इतर कागदपत्रे घेऊन संशयित पसार झाला आहे.

दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र, संशयित आरोपी आकाश मंडल याचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सुरु केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like