पुण्यातील हॉटेल्स व जीम बंदच राहणार ! दुकाने पी-1 आणि पी-2 नुसारच सुरू ठेवण्याबाबतचा विचार, मनपातील सुत्रांची माहिती

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यातील लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविल्यानंतर शहरातील व्यवसाय, व्यायामशाळा, हॉटेल्स, उद्याने सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या शहरामध्ये पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत असताना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या देखिल झपाट्याने वाढत आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या १ लाखांवर तर अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने हॉटेल्स, उद्याने तसेच व्यायामशाळा तूर्तास लॉकच ठेवण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी दिली. मात्र, संध्याकाळी उशिरा यासंदर्भातील आदेश आल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

राज्यात ३१ जुलैपर्यंत असलेला लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाउन वाढत असतानाच व्यापारी आणि व्यावसायीकांकडून आर्थिक संकटाचा विचार करून पी १, पी २ ची अट शिथील करावी, अशी मागणी होत आहे. तसेच व्यायामशाळा अर्थात जीम चालकांकडूनही याच कारणास्तव जीम उघडण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्य शासनाने काही आठवड्यांपुर्वी हॉटेल्स आणि उद्याने सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, पुण्यातील रुग्णसंख्येचा विचार करता, उद्याने काही दिवस सुरू करून नंतर बंद करण्यात आली आहेत. तर हॉटेल सुरू करण्यास परवानगीच देण्यात आलेली नाही. ३१ जुलैचा लॉकडाउन संपल्यानंतर महापालिकेकडून किमान हॉटेल आणि उद्याने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ADV

दरम्यान, यासंबधात महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी स्तरावर माहिती घेतली असता, १ ऑगस्टपासून १३ जुलैपुर्वी रोजी असलेली परिस्थितीच कायम राहाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. थोडक्यात हॉटेल्स व व्यायामशाळा बंदच राहाणार असून दुकानेही पी १, पी २ नुसारच सुरू ठेवण्याबाबत विचार करण्यात आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत संभाव्य रुग्णसंख्या गृहीत धरून तसेच जंबो कोविड सेंटर उभारणीचा कालावधी विचारात घेउन शहरात जैसे थेच परस्थितीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत, असे या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.