राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध?, मंत्री म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी (दि. 16) रेमडीसीवीरच्या तुटवड्याबाबत तातडीने बैठक घेतली. यावेळी एफडीएचे अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले, की, राज्यात सक्रीय रुग्ण 6 लाख 20 हजार आहेत. जवळपास दररोज आपल्याला 12-15 हजार इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. पुढील दोन ते चार दिवस तरी हीच स्थिती राहणार आहे. काही कंपन्यांच्या सीईओ आणि एमडींशी काही दिवसांपूर्वीच चर्चा झाली आहे. त्यानुसार दिवसाला 55 हजारांचा पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे. निर्यात बंदी झाल्याने देशात रेमडीसीवीरचा साठा उपलब्ध असेल. कालच मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार, निर्यात बंदीचा साठा राज्यात मिळू शकेल असा निर्णय झाला आहे. राज्यात जास्तीत जास्त साठा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. कंपन्यांचा इंजेक्शनच्या दरासंदर्भात काही गैरसमज झाला आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारी रुग्णालयात रेमडीसीवीरची सुदैवाने कमतरता नाही. पण खाजगी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करेन. दुसरीकडे हाफकीनच्या माध्यमातून चांगल काम होत आहे. 150 कोटी खर्च करुन या लसीला आपण सुरुवात करणार असल्याचे शिंगणे म्हणाले.