युद्धासाठी आपण किती सज्ज !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची)  “या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, भारत-पाक दरम्यानच्या लढाईत पाकिस्तानकडून चीन सहभागी झाला नाही तर आपलं सैन्य आणखी एक जबरदस्त हार पाकिस्तानला देऊ शकेल असं समर्थ, सक्षम आणि सबळ आहे. या लढाईची नीती-रीती आतां बदललीय. जिंकलेला भूभाग विजेता देश आपल्या ताब्यात ठेऊ शकत नाही. ज्याचा अनुभव आपण पाकिस्तानशी झालेल्या यापूर्वीच्या लढाईत घेतलाय. त्यामुळं अशा लढाईत लाभ होण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडं १५ दिवसाचं युद्ध देखील भारतासारख्या देशाला पांच वर्ष विकासापासून दूर ढकलतं. तेव्हा विजय हा देखील पराजयासारखाच ठरतो! पण पाकिस्तानसारख्या गुंड राष्ट्रचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर यावेळी त्याच्याशी युद्ध करून त्याचा माज कायमरीत्या उतरायला हवाय!”

———————————————
स ध्या प्रसिद्धीमाध्यमातून त्यातही दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांमधून युद्धज्वर निर्माण केला जातोय. पण यासाठी आपण किती सज्ज आहोत हे पाहावं लागेल. आपल्या लष्कराचं संख्याबळ पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य अशा पांच कमांडमध्ये विभागलेलं आहे. कोणत्याही दिशेनं शत्रू आला तर सैन्याला त्या दिशेनं लगेचच रवाना होता येईल अशारीतीनं लष्करी ताकदीची योग्य अशी रचना केलेली आहे. देशाच्या सीमा ज्यावेळी धगधगत असतात त्यावेळी प्रत्येक नागरिकांची मनं पेटून उठणं हे स्वाभाविक आहे. त्यातही कच्छ, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सरहद्दीवर, सीमावर्ती भागात राहणारे नागरिक युद्धाच्या पूर्वतयारीसाठी होणारी लगबग अनुभवत असतात. सीमेवर पाकिस्तानी सैनिकांची वर्दळ सुरू असताना आपल्या लष्करी जवानांना सरहद्दीवर आणण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वे यांच्या अनेक रेल्वेगाड्या उपयोगात आणाव्या लागतात. पाकिस्तानच्या सीमा या जवळ असल्यानं कच्छ, भूज, जामनगरकडे जाणारे महामार्ग केवळ लष्करी वाहतुकीसाठी ठेवावे लागतात. सीमावर्ती शहरामध्ये अशी उपाय योजना करावी लागते की, ज्यामुळं नागरी वाहतूक दुसऱ्या रस्त्यानं वळवावं लागेल.

सरहद्दीवर पाकची युद्धासाठी जमवाजमव
सध्या दररोज सीमेवर पाकिस्तानी फौजा गोळीबार करताहेत असं आपण वाचतोय. आपले सैन्य भारतात घुसविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी तशी जमवाजमव सुरू केलीय, त्याशिवाय गुप्तचर खात्यानं असा अहवाल दिलाय की, पाकिस्ताननं सीमेवरच्या गावांतील लोकवस्ती हलवून तिथं युद्धासाठी जुळवाजुळव सुरू केलीय. या भागातल्या नदीनाल्यावर छोटे पूल बांधले जाताहेत. विहिरी खोदल्या जाताहेत. लष्कराच्या छावण्या उभ्या करून सीमेवर सुरुंग पेरण्याचं काम सुरू झालंय. ‘मुजाहिद’ आणि ‘जहांबाज’ हे हवाई संरक्षणासाठीच्या नीमलष्करी दलाला सज्ज राहण्याचे आदेश दिले गेलेत. त्यापैकी दोन डिव्हिजन्सनं थेट दक्षिणेकडील ३०० किलोमीटर पुढं येत सतलज नदी पार करून राजस्थानजवळ आपला तळ उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं समजतं. खेमकरण, फिरोजपुर, गुरुदासपूर, अमृतसर अशा पंजाबातील परिसरात पाकिस्तानी सैन्य येऊन उभं ठाकलंय, तर आपलं सैन्य हाताची घडी घालून बसतील असं काही होणार नाही. तेही सज्ज होताहेत. हवाईदलाच्या सहाय्याने पाकिस्ताननं लाहोर सेक्टरजवळून आपल्या पंजाबतल्या हुसैनीवाला शहरातल्या सतलज नदीवरच्या हराईके पुलावर आक्रमण केलं तर, अमृतसर-फिरोजपुर ही शहरं अलग पडतील.असं झालं तर लष्कराला जम्मू परिसरात जाणं देखील मुश्किल होईल.

लष्कराची रचना पाच कमांडमध्ये केलेलीय
शत्रूराष्ट्र आपल्यावर आक्रमण करणार आहे असा संदेश मिळाला, अथवा सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सामान्यतः सैन्य कोणती पावलं उचलेल ह्याची माहिती घेण्यासाठी एका निवृत्त अधिकाऱ्याला भेटलो तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नियम असा आहे की सीमेवरच्या शांतताकाळात सरहद्दीवर निमलष्करी दल तैनात केलं जातं. आवश्यक तेवढे जवान तिथं ठेवून इतरांना कमांड परिसरात राहण्यासाठी पाठवलं जातं. सध्या आपल्या लष्कराच्या संख्याबळानुसार पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य अशा पांच कमांडमध्ये पसरलेलं आहे. कोणत्याही दिशेनं शत्रू आला तर सैन्याला त्या दिशेनं रवाना करता येईल अशारीतीनं लष्करी ताकदीची योग्य अशी विभागणी झालेली असते. समजा दक्षिणेकडील सरहद्दीवर काही संकट निर्माण झालं तर सदर्न कमांड मधल्या जवानांना ताबडतोब युद्ध मोर्चेवर पाठवलं जातं. त्याचप्रमाणे उत्तर-पूर्वकडे चीननं हल्ला केला तर आसाम आणि अरुणाचल प्रदेश परिसरात नॉर्दन आणि ईस्टर्न कमांडमधून जवान तिथं पोचतील. शत्रूची तयारी कशाप्रकारची आहे, कुठे किती जवान आणि कोणत्याप्रकारच्या शस्त्रांची गरज आहे , त्याचा निर्णय दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्ये असलेल्या ‘टॉप सिक्रेट ऑपरेशन्स’ मधील उच्च लष्करी अधिकारी घेतात. त्यांच्या हुकुमानुसार विविध कमांड एरियातील इनचार्ज अधिकारी स्वतःकडील जवान आणि शस्त्रसामुग्री पाठवतात. त्याचबरोबर रजेवर असलेल्या वा कॅन्टोन्मेंट परिसरात राहणाऱ्या जवानांना ‘अलर्ट नोटीस’ जारी होताच सगळी काम बाजूला ठेवून सीमेवर जाण्याची तयारी सुरू करावी लागते. सध्या अद्यापि युद्ध छेडलं गेलेलं नाही म्हणून ज्यांनी लग्नाच्या निमित्तानं वा घरगुती कामाच्या निमित्तानं रजेवर गेलेल्या जवानांना पंधरा दिवसात परतायला सांगितलं गेलंय. युद्ध जाहीर झालं तर देशाच्या विविध भागातून असलेल्या जवानांना सरहद्दीवर पोचविण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करून केवळ जवानांची असलेली खास गाड्या सरहद्दीवर पाठविल्या जातात. येणाऱ्या आणि जाणाऱ्या या रेल्वेगाड्यांबाबत गुप्तता पाळली जाते. संरक्षण खात्यानं ‘आर्मी मोबिलाईझेशन’ चा निर्णय घेतला की, लगेचच त्याची सूचना रेल्वे खात्याला दिली जाते. मिळालेल्या सूचनेनुसार गाड्यांची तजवीज त्यांना करावीच लागते. जवानांव्यतिरिक्त वाहतुकीची वाहने, टॅन्क, जीप, इतर वाहनेही रेल्वेच्या माध्यमातून पाठविली जातात. मोठ्या आकाराची रॉकेट लॉन्चर, मिसाईल्स यांची जवळच्या भागांत जरी ने-आण करायची असेल तर ती रात्रीच्या अंधारातच केली जाते. भुज, बारमेर, जोधपूर, जेसलमेर, बिकानेर या सीमावर्ती शहरांमधून असलेल्या लोकांना लष्कराच्या या युद्धाबाबतच्या हालचाली पहाव्याच लागतात.

सीमेवर तात्पुरती आणीबाणी लावावी लागते
सरहद्दीवर पोचल्यावर लष्कराच्या वेगवेगळ्या विभागांना स्वतःची प्रारंभिक तयारी सुरू करावी लागते. उदाहरणार्थ भुज परिसरात भारतीय लष्कराची एक पूर्ण डिव्हिजन ज्यात सोळा हजार जवानांचा समावेश असतो, ते तैनात करण्यात आलं तर त्यात पायदळ व्यतिरिक्त आर्मर, आर्टिलरी, वाहनासह तोपदल, सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट युनिट, सिग्नल युनिट, इंजिनिअरिंग कोअर, मेडिकल कोअर, अशाप्रकारचे विभाग असतात. तिथं पायदळ जवानांना बंकर खोदावे लागतात स्वतःचं संरक्षण आणि प्रसंगी हल्ला करण्यासाठीचं व्यूहात्मक पोझिशन घ्यावी लागते. मोठमोठाले बंकर खोदून त्यात तोफ, मोरटार, मशीनगन्स आणि आवश्यक तेवढा दारुगोळा भरून ठेवावा लागतो. काही ठिकाणी लहान टेकडीवर वा झाडाझुडुपांमध्ये लपवून त्याच्या उंच भागांत चौकी उभी केली जाते, तोफदळ देखील शत्रूवर हल्ला करता यावा यासाठी विविधरीतीनं तोफांची मांडणी करते. पायदलाला हे काम करण्यासाठी गरज पडली तर रस्ता होईल अशाठिकाणी रस्ता तयार करून देण्यासाठी, नदीनाल्यांवर पूल बांधण्यासाठी व इतर तत्सम कामकाजासाठी इंजिनिअरिंग कोअर सज्ज असतो. युद्धभूमीवर कशा प्रकारची स्थिती आहे आणि कशाप्रकारची कुमक लागणार आहे याची माहिती देण्या-घेण्यासाठी पायदळाच्या मागे सिग्नल आणि कम्युनिकेशन युनिट तयार असतं. ट्रान्समीटर आणि शक्य झाल्यास टेलिफोन कनेक्शन घेऊन संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी सिग्नल युनिट तयार केली जाते. जुनी तात्पुरती हवाई पट्टी तयार करणे, स्वतः ती साफसूफ करून नव्यानं निर्माण करणे आणि गरज पडली तर हवाई दलाच्या गरजेनुसार नवीन हवाई पट्टी बांधावी लागते. संरक्षणाच्या दृष्टीने गरज पडली तर सीमेवरच्या गावांना रिकामं करावं लागतं. हे काम देखील लष्कराला करावं लागतं. त्या काळात या ग्रामीण भागात तात्पुरती आणीबाणी जाहीर करावी लागते. आपण पाहिलं की, गेल्या बुधवारी पाकिस्तानचं एफ १६ विमान भारतीय सीमेमध्ये घुसून आलं होतं त्यानंतर उत्तर भारतातल्या आठ एक एअरपोर्टचं काम तात्पुरतं थांबवण्यात आलं होतं. पाकिस्तानजवळ अमेरिकेने दिलेलं हारपून त्याचबरोबर फॉकलंड युद्धात प्रसिद्ध बनलेल्या एक्झॉस्ट मिसाईल्स आहेत. यापूर्वी पेटन टँक आणि सबरजेट सारखे अद्यावत विमान वापरण्यात पाकिस्तानचे सैन्य प्रशिक्षित झालेलं नव्हतं. आता अध्ययावत शस्त्रसामग्री नी त्याचबरोबर उच्च प्रकारच्या प्रशिक्षित केलेले सैनिक पाकिस्तान जवळ आहेत.

युद्ध झाल्यास महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्याची शक्यता
जर आता युद्ध झालंच तर एफ १६ विमानांच्या माध्यमातून पाकिस्तान मुंबई शहरावर हल्ला करण्याचा विचार जरूर करेल. आपल्याला आठवत असेल की, १९७१ दरम्यान २ सेबरजेट विमानं मुंबईजवळ आली होती. त्यावेळी शत्रूनं ओएनजीसीतील बॉम्बेहाय विभागाच्या तेलविहिरी त्याचबरोबर ऑईल प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित केलं होतं. हा अनुभव लक्षांत घेऊन बॉम्बेहाय आणि खंबातच्या आखाताजवळ २०० चौरस मैल परिसरात नौकादलानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केलीय. शत्रूनं सबमरीन, टोपीर्डो वा हवाई हल्ला करून बॉम्बेहाय नष्ट करू नये यासाठी आपलं नौदल आणि हवाईदल सज्ज ठेवण्यांत आलेलं आहे. सरफेस टू मिसाईल्स आणि मिग २९ विमानांचे स्क्वॉद्रन सज्ज ठेऊन मुंबईच्या दिशेनं फिरकणाऱ्या कोणतंही एफ १९ विमान पाडण्यासाठी आपण सज्ज बनलेलो आहोत. हल्ला करण्यासाठी चारच काय आठ विमानं एकत्रितपणे आली तरी ती हाणून पाडण्यासाठीची रडार यंत्रणा आपण जागोजागी उभारलीय.

सर्वात मोठा धोका अणुभट्ट्या सुरक्षेचा
मुंबई शहर आणि समुद्राच्या किनारपट्टीपासून १५० मैल आत लांब असलेल्या ओएनजीसीच्या फ्लॅटफार्मशिवाय आपल्याला ट्रोम्बे, नरोडा, राणा, प्रतापसागर आणि कल्पकम यासारख्या अणुभट्टयाचंही संरक्षण करायचं आहे. तर भारतीय हवाई दलाचं लक्ष्य असेल ते पाकिस्तानच्या काहुटाच्या अणुभट्टीवर! कराचीच्या बंदराचं यापूर्वीच्या लढाईत भारताच्या नौदलानं मोठं नुकसान केलेलं आहे. यावेळी युद्ध झालंच तर आपल्या नौदलाची क्षमता आणि व्याप्ती खूप मोठी बनलेली आहे. शिवाय आयएनएस विक्रमादित्य हे विमानवाहक जहाजसुद्धा अरबी समुद्रात मोठ्या लाटा उसळविल! आपल्याकडं एक विमानवाहक जहाज आहे पण पाकिस्तानकडे एकही नाही. पाकिस्तानकडे पांच सबमरीन आहेत तर आपल्याकडं चौदा सबमरीन आहेत. ह्याबाबी लष्करीदृष्ट्या महत्वाच्या नाहीत असं त्यातले तज्ज्ञ म्हणतात. कारण देशाच्या ७ हजारपेक्षा अधिक लांबीच्या समुद्रकिनारपट्टीची सुरक्षा करण्यासाठी आपलं नौदल अधिक सुसज्ज आहे. आपल्याला सर्वात मोठा धोका आहे तो काश्मीरच्या सुरक्षेचा!

जगातील सर्वात उंच ठिकाणी जवान तैनात
काश्मीरचा पश्चिमीकडचा १२ हजार ९०० चौरस किलोमीटर पाकिस्तान आणि पूर्वेकडील ३९ हजार चौरस किलोमीटर एवढा भूभाग चीननं गिळंकृत केलाय. हा गिळंकृत केलेला भूभागावर ताबा मिळवून राखण्यासाठी भारतातील बराच परिसर खेचून घेण्यासाठी पाकिस्तान आणि चीन बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहेत. लडाखच्या सियाचीन भागात १८ हजार फूट उंचीवरच्या हिमखंडावरून भारत पहारा देतोय. जगातल्या कोणत्याच देशाकडे एवढ्या उंचीचं लष्करी ठाणं नाही. १९७८ मध्ये भारतीय भूदलाच्या एका तुकडीनं इथं पर्वतारोहण करण्यासाठी भारताचा नकाशा तपासला तेव्हा अमेरिकेच्या नकाशामध्ये हा भूभाग पाकिस्तानचा दाखवला असल्याचं पाहून भूदल अधिकारी सारे अचंबित झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी या परिसरात ठाणी उभारण्याचा निर्णय घेतला. भारतासमोर आव्हान देताना गरज पडली तर एकमेकांना त्वरेने लष्करी मदत करण्यासाठी चीन-पाकिस्ताननं चीनच्या ताब्यात असलेल्या अक्षय चीनपासून पाकिस्तानच्या ताब्यातील आझाद कश्मीरपर्यंत ७९५ किलोमीटर लांबीचा काराकोरम महामार्ग बांधलाय ज्याचं एक टोक हे पाकिस्तानातल्या इस्लामाबादपर्यंत आहे. या महामार्गाचं महत्वाचं हे की, १७ हजार फूट उंचीवर असलेल्या जिथं भारत, पाकिस्तान, चीन आणि रशियाची सीमा एकत्र येतात तिथून हा रस्ता जातो आहे. अफगाणिस्तानची सीमादेखील इथून खूपच जवळ आहे. चीन आणि पाकिस्तानी या दोघांच्या जवळपास १५ हजार सैनिकांनी वीस वर्षाच्या मेहनतीने, चारशे सैनिकांचा बळी देऊन काराकोरम महामार्ग बनविण्यासाठी जो प्रचंड खर्च केलाय त्याचा आकडा देखील गुप्त ठेवण्यात आलाय. आता या महामार्गाच्या रक्षणासाठी दहा हजार सैनिक पहारा देताहेत.

संरक्षणासाठी हिमालयाचा खडा पहारा
पाकिस्तानशी युद्ध झालं तर कदाचित चीन या संघर्षात मध्ये पडणार नाही. परंतु उत्तर-पूर्वेकडील हिमालयाच्या बर्फाळ पर्वताच्या सीमेवर प्रचंड प्रमाणात चीनचं सैन्य उभं ठाकलं तर भारतीय लष्करासमोर मोठं आव्हान असेल. तसं पाहिलं तर चीनचा डोळा भारताचं बाविसावं राज्य म्हणून अस्तित्वात आलेल्या अरुणाचल प्रदेशावर तर आहेच. चीनची लष्करी ताकद आपल्यापेक्षा खुपच मोठी असली तरी चीनसमोर आपल्याला युद्धासाठी सज्ज व्हायचं असेल तर आपल्यालाही तेवढंच ताकदवान बनायला हवंय. पण लष्करी तज्ज्ञांच्या मते चीनचं लष्करी सामर्थ्य कितीही मोठं असलं, त्याच नौदल कितीही शक्तिशाली असलं तरी जोपर्यंत हिमालय भारताचा खडा पहारेकरी आहे तोपर्यंत चीनला भारतावर हल्ला करणं खुपच कठीण जाणारं आहे. असं झालं तर १९६२ साली जसं सहजसाध्य झालं तसं आता होणार नाही! समजा चीननं आक्रमण केलंच तर आपल्या सैन्याला रसद पुरविण्यासाठी त्याला खूप अडचणीचं ठरणारं आहे. आपल्यासाठी हे खूप सोपं जाणारं आहे. जर भारतीय भूदल हवाईदलाच्या मदतीनं चीनी सैन्यावर तुटून पडले तर चीनला पळता भुई थोडी होईल. नाहीतर हिमालयाच्या बर्फ़ातच त्यांचा दफनविधी होईल. याशिवाय भारताचं पृथ्वी, अग्नी, ब्राह्मोस मिसाईल चीनच्या अंतर्गत भूभागावर प्रचंडरित्या हल्ला करू शकेल. आपल्याला चीनची भीती वाटते ती त्याच्याकडील अणूशस्त्राची! चीनने त्याचा वापर केला तर आपल्याला लाचार व्हावं लागेल पण चीन असं करणार नाही कारण भारताच्या पाठीशी अणूशस्त्रसज्ज मित्रराष्ट्र रशिया खंबीरपणे उभा आहे. चीन-रशियाच्या सीमेवरील मंगोलिया भागात असलेल्या तेल साठ्याच्या विराट क्षेत्रावर जर रशियानं हल्ला केला तर चीनला ते महागात पडणार आहे.

वाळवंटी रण भारताचं संरक्षण करतो
ज्याप्रकारे उत्तर-पूर्वेकडे हिमालय आपल्या सीमेवर संरक्षण करीत उभा आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेला पाकिस्तानबरोबरची दीडहजार किलोमीटर लांबीची काश्मीरपासून कच्छपर्यंतच्या सीमेवर ‘बफर’ प्रमाणे वाळवंटी रण उपयोगी पडतो आहे. कच्छचं रण दोन्ही देशामध्ये ६० मैलाचं अंतर उभं करते. पूर्व-पश्चिम २५६ किलोमीटर लांबीचं आणि उत्तर-दक्षिण १२३ किलोमीटर पसरलेलं कच्छचं रण त्याचबरोबर राजस्थानचं रणप्रदेशात वर्षातले सहा-सात महिने उंटाशिवाय फिरणं शक्य होत नाही. त्यामुळं याभागातून आक्रमण करणं अडचणीचं ठरतं. राजस्थानच्या रणप्रदेशापेक्षा कच्छच रण खूपच भयानक आणि कठीण आहे. इथली जमीन ही मिठाच्या खाऱ्यापाण्यानं कडक बनलेली आहे. रणप्रदेशात नागरिकांना प्रवेशबंदी आहे. हा भाग भयानक बनलेला आहे. डोळ्यावर हात धरला नाहीतर तिथल्या उडणाऱ्या धुलिकणांमुळे आपण डोळे उघडूच शकत नाही. दुपारच्या उन्हातल्या वाऱ्याचा सपाटा असा असतो की, आपले गाल लाल होतात, जणू कुणी आपल्या गालावर लगावली आहे की काय असं वाटतं. अशा धगधगत्या रणविस्तार पावसाचं पाण्यानं भरलं तर रण मधील कडक जमीन समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे चिखल आणि दलदलीचं साम्राज्य बनतं. या भागात कुणी वाहन चालवू शकत नाही. तिथल्या बेट सारख्या भागातून आपल्या सीमेच्या ठाण्यातून पहारा देणारे आपले जवान चातुर्मास दरम्यान कच्छपासून अलग पडतात. बेडीया बेटावर असलेलं सीमेवरचं आपलं लष्करी ठाणं यापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची हद्द सुरू होते. दोन्ही देशांच्या सीमा अलग राखण्यासाठी त्याच्यामध्ये संपूर्ण सीमेवर प्रत्येक १ हजार मीटर अंतरावर पांच फूट उंच तीन फूट रुंद शिवलिंगाच्या आकाराचे खांब रोवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय नियमानुसार युद्धबंदीच्या काळात सीमेवर लष्करी जवान तैनात करता येत नाहीत. त्यामुळं सरहद्द संरक्षक दल यासारखे निमलष्करी दलाकडे ती कामगिरी सोपविली जाते.

पश्चिम सीमेवर भुजची महत्वाची भूमिका
कच्छच्या सरहद्दीवरील संपूर्ण भागाची जबाबदारी ७५ व्या इंफंट्री ब्रिगेड सांभाळते. कच्छ सरहद्दीच्या दृष्टीनं भुजचं विशेष महत्व आहे. इथून खावडामार्गे रणकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खावडा आणि गांधीधाम इथं नुकतंच लष्करी ठाणं उभारण्यात आलं आहे. भुजपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेलं विमानतळ त्याचबरोबर १०८ किलोमीटर अंतरावरचं नलिया विमानतळ सध्या हवाई दलाच्या ताब्यात आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी नलिया विमानतळ अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. सध्या कच्छमध्ये बंदर नाही पण गरज पडली तर जामनगर वा ओखा बंदरावरून हवी ती मदत मागविता येऊ शकते.

– हरीश केंची
९२२३१०६०९

You might also like