खंडणी प्रकरणात हिंदू-राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई निर्दोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यवसाय चालू ठेवण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (वय-४१ रा. हिंदूगड, मुळशी) यांच्यावर खंडणी मागितल्याचा गुन्हा पौड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयाने धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर एल वडणे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून देसाई यांनी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी ११ सप्टेंबर २०१० रोजी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणामध्ये अशोक एकनाथ कुऱ्हाडे यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कुऱ्हाडे यांचा दारवली गावामध्ये स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. याचा त्रास आजूबाजूच्या गावातील लोकांना होत आहे, स्टोन क्रशरचा व्यवसाय चालवायचा असेल तर १० लाख आणि महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच त्यांचे अपहरण करून त्यांना घरामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार कुऱ्हाडे यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून देसाईंविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाचे वतीने 4 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. फिर्यादी कुऱ्हाडे यांनी असा प्रकार घडला नसल्याचे न्यायालयात शपथेवर साक्ष देताना सांगीतले. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम बी रानमाळे यांची न्यायालयात साक्ष झाली. धनंजय देसाई यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी जेव्हा ही घटना किंवा गुन्हा घडला त्यावेळी या गुन्ह्यात पौड पोलीसांनी अटक केलेले काही आरोपी हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात दुसऱ्याच गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. धनंजय देसाई यांना फक्त राजकीय वादातून न घडलेल्या गुन्ह्यात तत्कालीन सरकारने अडकविले असा युक्तिवाद अ‍ॅड. मिलींद पवार, अ‍ॅड. अजय ताकवणे, अ‍ॅड. विश्वास खराबे व अ‍ॅड. अनिकेत जांभुळकर यांनी केला.

देसाई यांनी न्यायालयात लेखी जबाब देऊन मला सरकारने त्रास देण्यासाठी व हिंदूत्वाचा प्रसार व प्रचार करू नये म्हणून खोटा गुन्हा तयार करून अडकवलं व अश्याच पध्दतीने मला पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या मोहसिन शेख याच्या खुनाच्या गुन्ह्यातही सरकारने त्रास देण्यासाठी खोटं अडकवलं असून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे असे लेखी निवेदन न्यायालयात दाखल केले होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, देसाई यांचे लेखी निवेदन ग्राह्य धरून धनंजय देसाई व राजू वाघीरे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

आरोग्यविषयक वृत्त –