Palghar News : बँकेत बनावट सोने ठेवले तारण अन् लाटले दोन कोटी; पती-पत्नीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या बँकेतील अनेक घोटाळे उघड होत आहेत. पीएनबी, येस बँक या नामांकित बँकांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर आता दोन कोटींचा घोटाळा समोर आला आहे. बँकेत बनावट सोने तारण ठेवून दोन कोटींची फसवणूक करण्यात आली.

महाराष्ट्रातील ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत 2 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. हा घोटाळा पती-पत्नी, बँक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअर यांनी मिळून केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांनी आरोपी हेमंत उदावंत आणि त्याच्या पत्नीला अटक केली. उदावंत आणि त्याची पत्नी 2016 पासून फरार होते. दोघांनी 2016 मध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून सोने तारण ठेवून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आरोपीने त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य, ड्रायव्हर, कर्मचारी आणि नातेवाईकांच्या नावाने अनेक खाती उघडली. त्यानंतर बँक मॅनेजरने बँकेच्या गोल्ड व्हॅल्यूअर आणि इतर स्टाफ यांच्या संगनमताने हा घोटाळा केला.

5.6 किलोंचे बनावट सोने तारण

या खात्यांच्या माध्यमातून बनावट सोने तारण ठेवून त्यावर दोन कोटींचे कर्ज घेतले. त्यासाठी सुमारे 5.6 किलोंचे बनावट सोने बँकेत तारण ठेवून गोल्ड व्हॅल्यूअरने खरे सोने असल्याचे सर्टिफिकेट देऊन मदत केली.