चहा करून न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीने चहा करून दिला नाही म्हणून राग आल्याने पतीने पत्नीचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी येथे घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंगल रमेश गायकवाड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पती रमेश गणपती गायकवाड हा स्वत: कुरूंदवाड पोलिसांत हजर झाला आणि त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

आरोपी रमेश हा रात्रपाळीचे काम करून सकाळी साडेअकरा वाजता घरी आला होता. उपवास असल्याने त्याने फराळासाठी पत्नीला खिचडी करण्यास सांगितले होते. त्याच्यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. चहा करून देण्यावरून पुन्हा भांडण सुरू झाले. भांडणाचा राग मनात धरून मंगल यांनी माहेरी जाते म्हणून कपड्याची पिशवी घेऊन घरातून बाहेर पडल्या. खिद्रापूर-सैनिक टाकळी रस्त्यावरील बस थांब्याजवळ मंगल गायकवाड येऊन थांबल्या होत्या. रमेश त्यांना बोलविण्यासाठी थांब्याजवळ गेला असता दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात रमेशने सोबत आणलेल्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून मंगल यांचा खून केला. पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान, कुरूंदवाड पोलिसांनी खुनात वापरलेली दोरी, पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपड्याची पिशवी जप्‍त केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.

[youtube https://www.youtube.com/watch?v=k2-6B0UeGoM]