चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना विरार भोईर-पाडा येथे उघडकीस आली आहे. पत्नीचा गळा चिरून खून केल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे.

शुभा किशोर फुटणे (वय-42) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी किशोर फुटणे याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किशोर फुटणे हा रिक्षा चालक आहे. किशोर आपल्या कुटुंबासह भोईर पाडा परिसरातील बाळकृष्ण सोसायटीत राहतो. आज सकाळी त्याने पत्नीचा निर्घृण खून केल्यानंतर तो विरार पोलीस ठाण्यात हजर झाला.

किशोर आणि त्याच्या पत्नीमध्ये मागील काही वर्षापासून वाद सुरु होते. त्याच वादातून ही घटना घडली. रविवारी सकाळी किशोर नेहमीप्रमाणे रिक्षा चालवण्यास गेला होता. तो आपला मोबाईल घरी विसरला होता. दोन भाडे केल्यानंतर मोबाईल घेण्यासाठी तो घरी आला होता. त्यावेळी त्याला घरात कोणीतरी आल्याचा संशय आला. यावरून दोघामंध्ये जोरदार भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने त्याने घरातील विळी आणि वरवंट्याने शुभावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शुभाचा जागीच मृत्यू झाला.