चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून केला खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना भांडूप येथील हनुमान नगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. भांडुप पोलिसांनी आरोपी पतीना अटक केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. आरोपीने पत्नीचा खून केल्यानंतर रात्री उशीरा भांडूप पोलीस ठाण्यात हजर राहून खुनाची कबुली दिली.
शिवानी महिरे (वय-१९ रा. हनुमान नगर, भांडूप) असे खून झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. तर अमर महिरे (वय-२२ रा. हनुमान नगर, भांडूप) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिवानीला वारंवार एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन येत होते. काल सकाळी साडे आठच्या  सुमारास असाच फोन शिवानीला आला. त्यानंतर अमर तिला कोणाचा फोन आला विचारलं असता तिने मैत्रिणीचा फोन असल्याचं सांगितलं. मात्र, ती मित्राशी बोलत असल्याचं उघड झाल्यानंतर चिडलेल्या अमरने कपडे वाळत घालण्याची दोरीने गळा आवळा. गळा आवळल्याने शिवनी जागीच मरण पावली.
त्यानंतर घरात मयत पत्नीला ठेवून, घराला कुलूप लावून काल संपूर्ण दिवसभर अमर कांजूरमार्ग परिसर फिरत होता. शेवटी त्याने रात्री उशिरा विक्रोळीतील पार्क साईट पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी अमरला भांडुप पोलिसांच्या हवाली केले. भांडुप पोलिसांनी घरातील शिवनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.