हैदराबाद रेप केस : बलात्कार करणार्‍या आरोपीच्या पत्नीनं केली धक्कादायक मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –  हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. ठिकठिकाणी लोकांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. आणि नंतर या प्रकरणातील आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले. हे एन्काउंटर कायद्याला धरून नसल्याचे अनेक दिग्गजांनी सांगितले आणि त्याबाबत चौकशी व्हावी अशी विनंती केली. या एन्काउंटरची चौकशी आता सुप्रीम कोर्टाची समिती आणि तेलंगणा पोलिसांची खास SIT करत आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने सर्व आरोपींचे शव जतन करण्यास सांगितले आणि त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलेले नाहीत. त्या चार आरोपींपैकी एक आरोपी म्हणजे, चिन्नाकेशवुलूची पत्नी गर्भवती असून तिने सरकारकडे नोकरी आणि १० लाखांची मदत मागितली आहे. तिने सांगितले की, माझा मेलेला पती आता काही परत येणार नाही. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला कसं सांभाळणार त्यामुळे सरकारने मदत करावी असे तिने एका वृत्तपत्रास सांगितले.

दरम्यान, तेलंगणा राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीला विरोध दर्शविला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं चौकशीसंदर्भातील आक्षेप नाकारला आहे. आणि सुप्रीम कोर्टातील माजी न्यायमूर्ती व्ही. एस शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. न्यायालयाने आगामी सहा महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आयोगातील अन्य सदस्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रेखा प्रकाश बाल्डोटा आणि सीबीआयचे माजी प्रमुख कार्तिकीयन यांचा समावेश आहे.

या घटनेत आरोपींना मिळालेल्या शिक्षेनंतर या प्रकारांवर काहीशा प्रमाणात का होईना आळा बसणार असे वाटले होते, परंतु तसे न घडता हैदराबादमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने १८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना ८ डिसेंबरला घडली होती. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात असतानाच हा प्रकार घडला होता. त्यावेळी त्या रस्ता विसरल्या होत्या. नंतर आरोपीच्या भावाने त्यांना बघितले. नंतर त्याने दोन्ही मुलींना स्वत:च्या घरी नेले. तेव्हा त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवलं. तेव्हा त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील एका लॉजवर नेलं. लहान मुलगी झोपताच मोठ्या बहिणीवर त्या नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्या दोघींना सोडून तो फरार झाला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन केला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/