भाजप नेते राम शिंदे म्हणाले… ‘मी विकासाचा दहशतवादी !’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायत निवडणुक दरम्यान कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा सामाजिक गुंड कोणी नाही, असा सज्जड दम दिला होता. त्याला भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या 25 वर्षांत आपण या मतदारसंघात विकासाची दहशत निर्माण केली आहे. जे कोणी स्वत:ला सामाजिक गुंड म्हणवून घेत असतील त्यांनी त्याचे विश्लेषण करावे. मात्र दबाव आणि दडपशाहीचे राजकारण फार काळ टिकत नाही, असा टोला शिंदे यांनी आ. पवार यांना लगावला आहे.

प्रा. शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जामखेड तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत भाजपच्या कामगिरीची माहिती दिली. आमदार पवार यांनी 80 टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्याचा दावा केला होता. त्यावर शिंदे म्हणाले की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. या तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील 23 ग्रामपंचायती निर्विवादपणे भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. 4 बिनविरोध झाल्या असून 10 ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे शिंदे म्हणाले. जामखेड तालुक्यात भाजपच्याच ग्रामपंचायती सर्वात जास्त असल्याचे ते म्हणाले.

तेव्हा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढू : प्रा. शिंदे
मुळात आमदाराने गावपातळीवरील राजकारणात फार लक्ष घालायचे नसते. हा संकेत आपण आतापर्यंत पाळत आलो. मात्र, पवार यांनी इतिहासात प्रथमच थेट गावपातळीवर जाऊन प्रचार केला आहे. आपण कधीच गटातटाचे राजकारण केले नाही. माझ्यावर असा आरोप करणारेच सर्व संकेत बाजूला सारत गावात जाऊन दबावाचे राजकारण करीत होते. आता लवकरच नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याची आम्ही वाट पहात असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.