भानामती करा, लिंबू बांधा, मी कोणाला घाबरत नाही, सतेज पाटलांनी विरोधकांना सुनावले खडे बोल 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तुम्ही भानामती करा, नाही तर लिंबू बांधा मला काहीच फरक पडत नाही’, अशा शब्दात कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ (बंटी) पाटील यांनी चांगलंच ठणकावलं आहे. एकाच आठवड्यात दोन वेळा पाटील यांच्या यशवंत निवास या बंगल्याच्या बाहेर करणीचे प्रकार उघडकीस आले होते. त्याला उत्तर देताना पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.
करणीच्या प्रकाराबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे भानामती आमच्या घराकडे येऊ लागली आहे. तुम्ही भानामती करा, लिंबू बांधा, किंवा दुसरं काही पण करा, मला काही फरक पडत नाही आणि मी त्याला घाबरत पण नाही. आमचं ठरलं आहे, कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही.’ अशा शब्दात सतेज पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

नक्की काय आहे प्रकरण ?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या बंगाल्याच्या दारात एकाच आठवड्यात दोन वेळा करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कसबा बावडा येथील त्यांच्या बंगल्याच्या दारात अमावस्येच्या रात्री पांढऱ्या कपड्यात हळदी कुंकू, बाहुली बांधून बंगल्याच्या झाडीत ठेवण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारचे कृत्य उघडकीस आल्यामुळे या परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

आमदार सतेज पाटील यांचा कोल्हापुरात राजकीय दबदबा आहे. कसबा बावडा येथील पाटील यांच्या यशवंत निवास या बंगल्यासमोरील झाडीमध्ये पांढऱ्या कपड्यात बांधलेली बाहुली टाकण्यात आली होती. हा प्रकार होऊन चार दिवस ओलांडतात तोपर्यंत बुधवारी अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा करणीचा प्रकार दिसून आला.

निवडणुकांच्या काळात अशा अनेक घटना यापूर्वी देखील उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सातारा जिल्ह्यातच राजकीय हेतू साध्य करण्यासाठी करणी केल्याचा धक्कादायक प्रकार मालकापुरात उघडकीस आला होता. दरम्यान, कोल्हापुरात देखील अनेकदा लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याबरोबरच सेवा संस्थांच्या निवडणुकीमध्येही अशा प्रकारच्या काळ्या जादूचा काही उमेदवारांनी अवलंब केल्याचे यापूर्वी पुढे आले आहे.

एका आठवड्यातच दोन वेळा करणीचा प्रकार समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले असून, कसबा बावडा परिसरात तसेच सतेज पाटील यांच्या समर्थकांमध्ये देखील या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.