पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम, म्हणाले – ‘शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना करून चूक केली नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाद ओढावून घेणारे जयभगवान गोयल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींची शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करून मी चूक केली नाही. पुस्तक तर आता बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल असे जयभगवान गोयल यांनी सांगितले. या पुस्तकावरून संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना जयभगवान गोयल हे आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयभगवान गोयल यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी या दोघांचाही मी पूजक आहे. मला कुणाचीही भावना दुखवायची नाही. मात्र अनेक वर्षानंतर देशाला असा पंतप्रधान मिळाला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे धाडसी निर्णय घेतोय, असे म्हणत त्यांनी आपल्या दाव्याला पुष्टी जोडली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून भारताला कोणीही वाली नव्हता. आपल्या संसदेवर, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतावर एकही हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला होता. यावर मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून प्रत्युत्तर दिले, असे यावेळी त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराज ज्याप्रमाणे प्रत्येकाची, राज्यातील माता, भगिनींची चिंता करायचे तसेच मोदी देशातील माता, भगिनींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. आज प्रत्येक महिलेला आपण सक्षम असल्याचे वाटत आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज काम करायचे त्याचप्रमाणे मोदी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारताचा सन्मान वाढला असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ यांच्या वादग्रस्त पुस्तकाविरोधात राज्यभर निदर्शनं सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने राज्यातील जनतेमध्ये रोष आहे. भाजप सोडून सर्वच राजकीय पक्ष आणि वंशजांनी या पुस्तकाचा विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे.

पण दुसरीकडे भाजप नेतेही हे पुस्तक मागे घेण्याबाबत कारवाई करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. भाजपचे दिल्ली प्रभारी शाम जाजू यांनी याबाबत सांगितले की, जे काय म्हणणं मांडायचं ते लेखकाने मांडले आहे. जे शीर्षक आहे त्यात तीळमात्र शंका घेण्यासारखं काही नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हे पुस्तक मागे घेण्याच्या मागणीचं नेमकं काय होणार हा प्रश्न आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/