सचिन तेंडुलकर उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये ‘अ‍ॅडमीट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सचिनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे सांगून होम क्वारंटाईन होत असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र शुक्रवारी (दि. 2) त्याने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.

सचिनला कोरोनाची बाधा झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केल्या तसेच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या होत्या. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेचे आभार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की पुढील काही दिवसांत मी घरी पुन्हा परतेन. स्वतःची काळजी घ्या अन् इतरांनाही सुरक्षित ठेवा. वर्ल्ड कप विजयाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व भारतीय संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनला 27 मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिनने ट्विट करुन याची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत असल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.