#Loksabha : ‘रावेर’साठी रक्षा खडसेंची शिफारस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – रावेरसाठी मी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची शिफारस केली आहे. मात्र, जळगाव मतदारसंघातून कुणाची शिफारस करण्याचा मला अधिकार नसल्याने मी कुणाचीच शिफारस केली नसल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. जळगाव मतदारसंघासाठी भाजपत इच्छूक उमेदवारांची स्पर्धा मोठी असून, तब्बल बारा नावांची यादी असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव मतदारसंघासाठी भाजपने अद्याप आपले उमेदवार घोषीत केलेले नाहीत. मंगळवारी (दि. १९) जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते तेव्हा त्यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी येत्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल असे म्हटले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, येथे उमेदवारांची संख्या जास्त असल्याने स्पर्धा देखील मोठी आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे व अजय भोळे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांनी चांगल्या प्रकारे कामे केलेली आहेत, तसेच त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळावे अशी आपली इच्छा आहे, असे महाजन म्हणाले. मी याच मतदारसंघाचा मतदार असल्याने रक्षा खडसे यांची शिफारस केल्याची माहितीही त्यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना दिली