‘मी कोरोनाची लस घेणार नाही’ : बाबा रामदेव

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासंदर्भात मोठी तयारी आणि नियोजन केले आहे. मात्र मी कोरोना लस घेणार नाही. कारण मला त्याची गरज नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले आहे.

एका वृत्तवाहिनीवर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये, असे ते म्हणाले. तसेच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी कोरोनाची लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याचा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला आहे. बाबा रामदेव म्हणाले,135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 2021 मध्ये सामान्य लोकांना लस मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद आणि जीवनशैलीतील बदलांपासून लोकांचे प्राण वाचतील, असे ते म्हणाले.