युतीचा फॉर्म्यूला कन्फर्म ! राज्यात सत्ता आल्यास २.५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत जागा वाटपावेळी महाराष्ट्र विधानसभेत युतीची सत्ता आल्यास अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असेल हे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री पद प्रत्येकी अडीच वर्षासाठी शिवसेना आणि भाजपकडे असणार आहे. याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले. तर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

५०-५० फॉर्म्यूला

राज्यात शिवसेना भाजपचा ५०-५० फॉर्म्यूला ठरला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्रीपदासाठी निर्णय झाला. त्यात शिवसेना भाजपचा प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल असे ठरले. जे लोक फॉर्म्यूला निश्चित करताना नव्हते त्यांनी स्वार्थासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करू नये असे सरदेसाई यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर लोकसभा निवडणूकीआधीच हा फॉर्म्य़ूला ठरला असल्याचे कायंदे यांनी सांगितले आहे.

युती सरकारमध्ये असतानाच उध्दव ठाकरे यांनी मोदींवर कितीही टिका केली असेल तरी युतीत बेबनाव नसल्याचे चित्र सध्या आहे. मात्र आता सरदेसाई यांच्या ट्विटमुळे नवी माहिती समोर आली आहे. यावर कायंदे म्हणाल्या की, १९९९ नंतर पुन्हा राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायला मिळेल.