… तर पोलिसांची ड्युटी फक्त ८ तासाची

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पक्षाची सत्ता आल्यास पोलससांची ड्युटी ८ तासांची करण्याबाबत कायदा करू. तसेच होमगार्ड यांना पोलीस सेवेत सामावून घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितने पोलिसांच्या ड्युटीचा विषय जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोमवारी आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

पोलिसांना युनियन काढता येत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर केला. या जाहीरनाम्यात राज्यातील ५० हजार होमगार्डना पोलीस सेवेत कायम करण्याचे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवेल असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मते घेतल्याने याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यात तयार असल्याचे सांगून त्यांना १४४ जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र तेच आघाडीसाठी पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

वंचितची बदनामी होत आहे
विविध तपासयंत्रणांच्या दबाखाली आलेले काँग्रेसचे नेते भाजपा विरोधात आघाडी करत आहेत. आघाडी करत असताना ते वंचितला बदनाम करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाबरोबर आघाडीसाठी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर हे शेकापमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, गोपीचंद पडळकर हे वंचिताल सोडून जाणार नाहीत ते पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या आहेत, असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

आरोग्यविषयक वृत्त