IIT कानपूरच्या प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

कानपूर : वृत्तसंस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूरच्या संगणक व अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रमोद सुब्रमण्यम यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे कानपूर आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे. आयआयटी प्रशासनाने याची माहिती कल्याणपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक प्रमोद यांनी त्यांच्या खोलीत पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी खोलीची झडती घेतली मात्र पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. प्रमोद यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कँम्पस बंद आहे. त्यामुळे प्रोफेसर प्रमोद हे सध्या एकटेच खोलीत रहात होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दुपारी साडेबारापर्यंत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काय घडले हे समजू शकले नाही. आयआयटीचे संचालक अभय करंदीकर यांनी प्राध्यापक प्रदीप यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. नुकतेच कोरोना संक्रमित पत्रकाराने एम्सच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याचवेळी चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूतनेही मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.