सायकलवारी भोवली, ‘कोरोना’ची लाट आल्यामुळे संपूर्ण गाव बंद !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावच्या २४ जणांनी सायकलनं पंढरपूर गाठलं होतं. १४ डिसेंबर रोजी त्यांनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं होतं. पंढरपूरहुन दर्शन करून आल्यानंतर २४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच कोरोनाचा नवा विषाणू (Corona) आढळून आला आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. . राज्य सरकारनं सर्व जनतेला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. पण, आपल्यासह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. नाशिकमधील (Nashik) पंढरपुरात सायकलवर गेलेल्या २४ जणांमुळे ४१ गावकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी या २४ जणांचा स्वागत आणि सत्कार समारंभही झाला. मात्र यातील काही जणांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यामुळे तपासणी केली असता हे सर्व पॉझिटिव्ह आढळून आले. धक्कादायक म्हणजे या २४ जणांच्या संपर्कात आल्यानं तब्बल ४१ गावकऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या घटनेने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पुढील ८ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ही सर्व लोकं गावात आल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आले होते.

परिणामी, गावातील गावकऱ्यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम जर असेल तर घराबाहेर पडावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. गावात एकावेळी मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुन्हा कोरोनाची लाट पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.