कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आक्रमक, कन्नड भाषेतून बोर्ड दिसला तर….

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरातील कन्नड बोर्डावर शिवसैनिकांनी काळ फासलं आहे. यापुढे जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर शिवसेना स्टाइल कारवाई करण्यात येईल, अशा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी व्यावसायिकांना दम देत मराठी बोर्ड लावण्याचा आग्रह धरला आहे.

आपल्या व्यवसायाची माहिती ग्राहकांना कळावी म्हणून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक व्यावसायिकांनी दुकानावर, आस्थापनावर कन्नड बोर्ड लावले आहेत. मात्र यावरून शिवसैनिक संतापले आहेत. यापुढे कोल्हापुरात एकही कन्नड बोर्ड दिसता कामा नये, जर व्यावसायिकांनी बोर्ड लावलेच तर व्यवसाय बंद करू असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कानडीचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा कर्नाटकात जाळल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी कोल्हापूरमधील एका थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडले होते. त्यानंतर आता शिवसैनिकांनी कोल्हापूरातील कन्नड बोर्डावर काळ फासलं आहे.