“राफेलच्या चौकशीतून दोन नावं पुढं येतील ती लिहून ठेवा ; नरेंद्र मोदी व अनिल अंबानी”

दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी  राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा आरोप करत मोदींवर घणाघाती हल्ला केल्याचं समोर आलं आहे. राफेल कराराची संसदेत जेव्हा केव्हा चौकशी होईल त्यावेळी दोन नावं पुढे येतील ती लिहून ठेवा… नरेंद्र मोदी व अनिल अंबानी असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला. निल अंबानी व नरेंद्र मोदी हे मित्र असून अंबानींचं भलं करण्यासाठी त्यांचा ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करण्यासाठी राफेल करार केल्याचा आरोप पुन्हा राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सदर वक्तव्य केले आहे.

मोदींवर घणाघाती हल्ला करताना आणि आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, “सुप्रीम कोर्टानं राफेलसंदर्भात किमतीचा उल्लेख करताना कॅगकडे या किमती असल्याचे व पीएसीकडे या किमती असल्याचे सांगितले. परंतु मल्लिकार्जुन खर्गे या पीएसीचे अध्यक्ष असून त्यांना यातलं अक्षरही माहित नसल्याचे सांगितले आणि तसे वदवलेसुद्धा.” इतकेच नाही तर पीएसी ही मोदींच्या कार्यालयात किंवा फ्रान्सच्या संसदेत आहे का अशी कुत्सित टिप्पणीही त्यांनी केल्याचे दिसून आले.

दरम्यान राफेल करारासंदर्भात जॉइंट पार्लमेंटरी कमिटीची व चौकशीची आपली मागणी कायम आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे जेव्हा ही  चौकशी होईल त्यावेळी ३० हजार कोटींचा घोटाळा उघड होईल. महत्त्वाचे म्हणजे या घोटाळ्यात  नरेंद्र मोदी व अनिल अंबानी ही दोन नावे समोर येणार असा आरोपही त्यांनी केला.