Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10309 नवे पॉझिटिव्ह तर 334 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढू लागली आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोना महामारीमुळे 334 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 16 हजार 476 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.52 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 10309 नवीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 68 हजार 265 इतकी झाली आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 6 हजार 165 रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत 3 लाख 5 हजार 521 जण बरे झाले असून त्यांना दवाख्यान्यातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.40 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 1 लाख 45 हजार 961 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 36 हजार 265 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. राज्यात आतापर्यंत 24 लाख 13 हजार 510 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 4 लाख 68 हजार 265 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.