रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाची नगरमध्ये चाचणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शत्रूविरोधी लढण्यासाठी लष्करात समाविष्ट करण्यात आलेल्या लेसर नियंत्रण प्रणालीवरील रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची नगरमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराची भेदक क्षमता वाढली असून त्याचा उपयोग लवकरच पाकिस्तान आणि चीनलगतच्या सीमेवर केला जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

लेसर नियंत्रित क्षेपणास्त्राच्या चाचण्या नगरमधील के.के.रेंज येथे होण्याची ही पहिलीच वेळ होती. चार कि.मी. पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची काल एमबीटी अर्जुन रणगाडयावरून के. के. रेंज या लष्कराच्या क्षेत्रात चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला. नगर येथील आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूल संस्थेच्यावतीने ही चाचणी घेण्यात आली.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ‘अभ्यास’ या उच्च गती हवाई लक्ष्य वाहनांची ओडिशातील चंडीपूर येथे घेतलेली चाचणी यशस्वी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. लवकरच संरक्षण सामुग्री आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. त्यात त्यांना यश येत आहे. पुण्याच्या ‘आर्मामेंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र तयार केले असून त्यात ‘हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी व डेहराडूनच्या इन्स्ट्रमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ या संस्थेचाही वाटा आहे.