जखमी पृथ्वी शॉच्या जागेवर खेळणार कर्नाटकचा ‘हा’ खेळाडू

पर्थ : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणातच शतक ठोकणारा भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉला सिडनी क्रिकेट मैदानावर सराव  सामन्यात झेल पकडताना पायाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. पृथ्वी शॉ तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे वृत्त होते, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या जागी मयंक अगरवालची निवड झाली आहे.

आस्ट्रेलिया मालिकेत पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पृथ्वी शॉने सराव सामन्यात ६६ धावांची खेळी करत आपली झलकही दाखवली होती. पृथ्वी शॉ जखमी झाल्याने त्याच्या जागी  मयांक अगरवाची निवड  झाली आहे. तर मुरली विजय आणि लोकेश राहुल हे सलामीवीर वारंवार अपयशी ठरत असल्याने तसेच स्थानिक स्पर्धेत खोऱ्याने धावा काढणाऱ्या मयंक अगरवालला उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

‘फस्ट क्लास’आणि लिस्ट ‘अ’ क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने धावा काढणाऱ्या मयंक अगरवालची निवड होत नसल्याने अनेकांनी टीका केली होती. हरभजन सिंग ने देखील निवड समितीवर टीका केली होती. मात्र मयंक अगरवालच्या निवडीची प्रतीक्षा आता संपली असून त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले असून उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध करण्याची चांगली संधी त्याच्याकडे आहे.