Ind Vs Aus : सिडनी कसोटी रोमांचक स्थितीत; ऋषभ पंतचे शतक हुकले, भारताला विजयासाठी हव्या दीडशे धावा

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus)  यांच्यातील तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला असून चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या दमदार १४८ धावांच्या भागीदारीमुळे भारताच्या ४ बाद २५० धावा झाल्या आहेत. शतकाजवळ आलेल्या ऋषभ पंत याचे पुन्हा एकदा शतक हुकले़. ११८ बॉलमध्ये ९७ धावा केल्या़ पंत याला लायन याने कमिन्सद्वारे झेलबाद केले.

कालच्या २ बाद ९८ धावसंख्येवरुन पुजारा व रहाणे यांनी आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. गेल्या वेळी केवळ २२ धावा काढणारा अजिंक्य रहाणे यावेळीही अपयशी ठरला.त्याला लायनने वडे याच्याकरवी झेल बाद केले.रहाणे केवळ ४ धावा करु शकला.त्यानंतर ऋषभ पंत मैदानावर आला.त्याने आपल्या नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करत चौकार, षटकारांची बरसात केली.दुसऱ्या बाजूला चेतेश्वर पुजाराने नेहमीप्रमाणे एक बाजू लावून धरली होती. पंत याने ११८ बॉलमध्ये ९७ धावा केल्या.त्यात त्याने १२ चौकार आणि ३ षटकार लगावले.पंत शतक करणार असे वाटत असताना तो बाद झाला़.

भारताच्या आता ४ बाद २५० धावा झाल्या असून भारताला विजयासाठी अजून १५७ धावांची आवश्यकता आहे.तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी भारताचे ६ गडी बाद करायचे आहे.जडेजा जखमी असल्याने चेतेश्वर पुजारा आणि हणंमत विहारी या जोडीवरच भारत विजयाचे लक्ष्य गाठणार का हे निश्चित होणार आहे.कसोटीच्या अखेरच्या टप्प्यात दोघांनाही विजयाची संधी असल्याने सामना रोमांचक स्थितीत जाऊन पोहचला आहे.