इंदापूर तहसिल कार्यालयातील लिपीक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जमिनीची नोंद तहसील कार्यालयात करण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर तहसील कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. दुपारी ही कारवाई केली आहे.

नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (वय 35) असे पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

नितेशकुमार हे इंदापूर तहसील कार्यालयात लिपिक आहेत. यातील तक्रारदार यांच्या जमिनीचे महाराष्ट्र जमिनी महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप झाले होते. त्याची नोंद तहसील कार्यालयाच्या एस.आर. रजि.ला करायची होती. त्यांची याबाबत तहसील कार्यालयात पाठपुरावा केला होता. त्यावेळी आरोपी लोकसेवक नितेशकुमार यांनी तक्रारदार यांच्या कडे 2 हजार रुपयांची लाच मागणी केली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज दुपारी त्यांना तडजोडीअंती 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.