Solapur News : अनैतिक संबंधांच्या संशयावरून मैत्रीत दरार, धारदार शस्त्राने मित्रांनीच केले मित्राचे तुकडे, पुढे झाले असे काही

टेंभुर्णी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन –  माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथील संजय महादेव गोरवे (23) या युवकाचा अनैतिक संबंधांच्या संशयावरून 4 मित्रांनीच कट रचून धारदार शस्त्रानं वार करून निर्घृणपणे खून केला. जेवायच्या पार्टीला नेऊन त्याचा काटा काढला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात, पाय, डोके हे दुसऱ्या गावात फेकले. तपासाची चक्रे वेगानं फिरवत इंदापूर पोलिसांनी काही तासात 2 आरोपींना जेरबंद केलं आहे.

बुधवारी दि. 20 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. इंदापूर तालुक्यातील गणेशगाव शिवारात गारअकोले गणेशगाव या पुलाजवळ भीमा नदी पात्रात डोकं, हात, पाय नसलेले धड आढळून आले. माढा तालुक्यातील सजंय महादेव गोरवे याचाच तो मृतदेह असल्याचं समोर आलं. इंदापूर येथील बावडा आउट पोष्टचे सपोनि अमित जाधव फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण शिरगावकर यांनीही घटनासथळी भेट दिली. पोलिसांनी टेंभुर्णी पोलिसांच्या मदतीनं व माहितीगाराकडून मृत युवकाची पार्श्वभूमी तपासून माहिती मिळवली. आरोपी निश्चि करत त्यांनी तातडीनं तपास पथकं रवाना केली.

2 आरोपींना शिताफिनं पकडलं

इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासातच विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले, महेश प्रभाकर सोनवणे (दोघं रा. टाकळी (टें)) (ता. माढा. जिल्हा सोलापूर) या दोन संशयितांना टेंभुर्णी येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफिनं पकडलं. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली.

असा रचला खुनाचा खट

संशयित गुन्हेगारांनी पोलिसांना गंभीर माहिती दिली. मयत आणि मारेकरी हे एकाच गावातील एकमेकांचे मित्र होते. त्यांचं घरीही येणंजाणं होतं. त्यामुळं मृत युवकाबद्दल मारेकऱ्यांना अनैतिक संबंधाचा संशय होता. यानंतर त्यांच्या मैत्रीत अंतर पडू लागलं. यानंतर त्याला पार्टीचं आमिष दाखवलं. मारेकरी असलेल्या दोघांनी आणखी दोघांना यात सामिल केलं. 17 जानेवारी रोजी रात्री सर्वांनी मारेकऱ्याच्या मित्राकडे ओली पार्टी केली. परत घरी येताना ठरल्याप्रमाणे भीमा नदीवरील पूलाजवळ थांबून संजयला नदीपात्रात नेऊन सपासप कोयत्यानं वार केले. नंतर त्याच्या शरीराचे डोके, हात पाय असे तुकडे केले. धड नदीच्या पाण्यात टाकलं तर हातपाय आणि डोकं आणि कपडे हे संगम येथील पुलाखाली टाकले. बावड्यावजळ त्याची दुचाकी सोडली.

मुलगा घरी आला नाही म्हणून काळजी पोटी दुसऱ्याच दिवशी आईनं टेंभुर्णी पोलिसात मुलगा हरवल्याची तक्रार केली. पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचंही या तपासासाठी मार्गदर्शन झालं. त्यानुसार इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण शिरगावकर यांनी एपीआय अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमले. या पथकानं यशस्वी तपास करत दोघांना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात सहभागी आणि दोन जण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.