नाना पटोलेंचा PM मोदीवर हल्लाबोल, म्हणाले – ’70 वर्षात देशाने असला बेफिकीर अन् बेजबाबदार पंतप्रधान पाहिला नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असून देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. मात्र असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच राज्यात प्रचारसभा घेण्यात मग्न आहेत. गेल्या 70 वर्षात देशाने असला बेफिकीर आणि बेजबाबदार पंतप्रधान कधीच पाहिला नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जाहीरातीतून जनतेला कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः मात्र प्रचारसभांसह अनेक कार्यक्रमात मास्क घालत नाहीत, अशा पंतप्रधानांचा लोकांनी काय आदर्श घ्यावा, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.

नाना पटोले मंगळवारी (दि. 13) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदीवर जोरदार टीका केली. देशात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाब आदी राज्यात कोरोनाची भयानक स्थिती आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना कोरोनावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. मात्र 130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात. असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान कधीच पाहिला नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाचे दररोज दीड-पावणे दोन लाख रुग्ण आढळत आहेत. तर मृत्यूचे आकडेही अंगावर शहारे आणणारे आहेत. दिल्लीच्या तख्तावरून सात वर्षापासून सुरु असलेल्या तुघलकी कारभाराने देशाची जनता होरपळून निघत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयानक आहे. तर गुजरातमधील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडून पडली आहे. गुजरात सरकारने जनतेला रामभरोसे सोडल्याचे ताशेरे गुजरात उच्च न्यायालयाने ओढले असल्याचे ते म्हणाले.