भारत-चीन तणाव : LAC वर ‘ड्रॅगन’च्या सैन्यावर इस्त्रायली ‘हेरॉन’ ड्रोनचा वॉच

पोलिसनामा ऑनलाईन – गलवान खोर्‍यातील रक्तरंजित संघर्षानंतर चीनशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्णपणे तयारी करुन ठेवली आहे. चीनच्या बाजूला सुरु असलेली कुठलीही हालचाल सुटू नये, यासाठी भारताने ड्रोन विमानांद्वारे टेहळणी गस्त वाढवली आहे. भारताची 3 हजार 488 किलोमीटरची सीमा चीनला लागून आहे. लष्कराच्या मदतीसाठी इंडो-तिबेटीयन म्हणजे आयटीबीपच्या अतिरिक्त तुकडया सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत.

मिलिट्री ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट परमजीत सिंग आणि बीएसएफ-आयटीबीपीचे डायरेक्टर जनरल एस.एस.देसवाल यांनी लेहला जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर 20 जूनला आयटीबीपीच्या तुकडया तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन एनटीआरओला जास्तीत जास्त ड्रोन्सची तैनाती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरुन चीनच्या बाजूला नेमके काय सुरु आहे? ते अजून स्पष्ट होईल. आणखी ड्रोन विमाने खरेदी करण्यासाठी लष्कराला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या एलएसी कडून लडाखच्या सीमावर्ती भागातील माहिती गोळा करण्यासाठी इस्रायली बनावटीच्या हेरॉन ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यात निपुण असलेली विशेष फोर्स तैनात केली आहे.