काँग्रेसची ‘ती’ योजना म्हणजे ‘ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका’

ऊना : वृत्तसंस्था – काँग्रेसची ‘ओआरओपी’ योजना म्हणजे ‘ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका’ असे खोचक विधान करत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वन रँक वन पेन्शन योजनेवरून (ओआरओपी) काँग्रेसवर सडकून टीका केली. हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील संमेलनात ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान मोदींची वन रँक वन पेंशन योजना सेवानिवृत्त सैनिकांसाठी आहे. पण काँग्रेसने जी वन रँक वन पेंशन योजना चालवली आहे, तिचा उल्लेख मी केला नाही तर तो त्यांच्यावर अन्याय होईल. काँग्रेसच्या या योजनेचा अर्थ आहे ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका वड्रा रँक पेंशन. हा दोन्ही पक्षांमधील फरक आहे. आमची ओआरओपी योजना सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आहे, काँग्रेसची योजना गांधी आणि वड्रा परिवारासाठी आहे.” अशी टीका त्यांनी केली.
इतकेच नाही तर,  “काँग्रेसच्या सरकारने आतापर्यंत ७० वर्षे गरीबी हटवण्याच्या घोषणा केल्या. पण राहुल गांधीच्या चार पिढ्यांनी सरकार चालवूनसुद्धा ५५ वर्षांत गरीबी दूर केली नाही” असे खोचक वक्तव्य शाह यांनी केले. याशिवाय हिमाचल प्रदेशात लोकांनी पाच वर्षांत जे काँग्रेसचं सरकार पाहिलं त्यात राजा-राणी आणि राजकुमार यांच्या व्यतिरिक्त कोणालाही स्थान नव्हतं असेही शाह म्हणाले.