देशात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत घट, पण मृत्यूचं संकट कायम; गेल्या 24 तासात 3876 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा झालेला स्फोट आणि विविध राज्यांत पुरेशा आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची होत असलेली हेळसांड, यामुळे देशातील परिस्थिती बिकट बनली आहे. प्रचंड वेगाने होत असलेला प्रसार रोखण्यासाठी देशातील बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, दररोज होत असलेल्या मृत्यूंची संख्य कायम आहे. देशातील एकूण कारोनाबळींची संख्या अडीच लाखांजवळ पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी, मृत्यूंचे प्रमाण मात्र काळजी वाढवणारे आहे. देशात गेल्या 24 तासात 3 लाख 29 हजार 942 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासात 3 लाख 56 हजार 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 3 हजार 876 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 49 हजार 992 वर पोहचली आहे.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 2 कोटी 29 लाख 92 हजार 517 वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पहायला मिळत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात 3 लाख 56 हजार 082 रुग्ण बरे झाले आहेत. दशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37 लाख 15 हजार 221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 17 कोटी 27 लाख 10 हजार 066 जणांना लस देण्यात आली आहे.