‘हवामाना’ची अशीच भयानक स्थिती राहिली तर भारताची अवस्था ‘गंभीर’, ‘या’ अहवालानं केला खुलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या शतकाच्या अखेरीस भारताचे सरासरी तापमान 4.4 अंश सेल्सिअसने वाढेल. एवढेच नव्हे तर इथे असणारी उष्णतेची लाट 3 ते 4 पटीने वाढेल. चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता देखील वाढेल. समुद्राची पातळी 30 सेंटीमीटरने वाढेल. हे भयावह खुलासे भारत सरकारची वैज्ञानिक संस्था इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजीच्या पहिल्या हवामान मूल्यांकन अहवालात करण्यात आले आहेत.

‘भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलांचे मूल्यांकन’ हे या अहवालाचे नाव आहे, यानुसार भारतातील सर्वात उष्ण दिवसाचे तापमान 0.63 डिग्री सेल्सियस व रात्रीचे सर्वात थंड तापमान 0.4 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. देशाच्या हवामानाची अशी भयानक परिस्थिती 1986 ते 2015 पर्यंत म्हणजेच गेल्या 30 वर्षांत घडली आहे. या सर्व आकडेवारीनुसार पुढील 80 वर्षांत भारताचे सरासरी तापमान 4.7 डिग्री ते 5.5 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढेल.

1901 ते 2018 पर्यंत भारतातील सरासरी तापमानात 0.7 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. 1874 ते 2004 दरम्यान उत्तर हिंदी महासागराची पाण्याची पातळी 1.06 वरून 1.75 मिलिमीटरपर्यंत वाढली. यानुसार सन 2100 पर्यंत उत्तर हिंदी महासागराच्या पाण्याची पातळी 300 मिलीमीटर म्हणजेच 30 सेंटीमीटरने वाढेल. या कालावधीत जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 18 सेंटीमीटरने वाढेल.

जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा हंगाम असतो, तो 1951 ते 2015 दरम्यान 6 टक्क्यांनी खाली आला आहे. गंगेचे मैदानी प्रदेश आणि पश्चिम घाटाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जर आपण 1951 ते 1980 च्या कालावधीची तुलना 1981 ते 2011 च्या कालावधीपर्यंत केली तर आपल्याला समजेल की 1981 नंतर उष्णता आणि दुष्काळात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या दोन दशकांत हवामान बदलांमुळे पावसाळ्यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता आणि संख्या वाढली आहे. उत्तर हिंदी महासागरात चक्रीवादळांच्या प्रमाणातील वाढीचा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे. या अहवालानुसार 21 व्या शतकाच्या अखेरीस भारताचे सरासरी तापमान 55 ते 70 टक्क्यांनी वाढेल. यामुळे इकोसिस्टम, कृषि, स्वच्छ पाण्याचा स्रोत, पायाभूत विकासाची अवस्था खालावत जाईल. प्रत्येक दशकात उष्ण दिवसांची संख्या 9.9 च्या दराने वाढली आहे. तर रात्रींची संख्या 7.7 च्या दराने वाढली आहे.