भारत- अमेरिकेची 26 तारखेला दिल्लीत मोठी बैठक; चीनला लगाम घालण्यासाठी होऊ शकतो निर्णायक करार

नवी दिल्ली : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मोदी-ट्रम्प मैत्री सर्वश्रुत असल्याने याचा उल्लेख सध्या सातत्याने तेथील निवडणूक प्रचारात केला जात आहे. कारण अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू असतानाच भारत-अमेरिकेमध्ये येत्या 26 तारखेला दिल्लीत एक महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत चीनला लगाम घालण्याबाबत करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीचे पडसाद अमेरिकन निवडणूक आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू शकतात.

भारत-अमेरिका 22 मंंत्रिस्तरावरच्या या बैठकीत संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना आळा घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये महत्वाचे निर्णय यावेळी होऊ शकतात. 26 आणि 27 ऑक्टोबरला राजनाथ सिंह, जयशंकर आणि अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पाम्पिओ आणि संरक्षण सचिव मार्क एस्पर यांच्यात ही बैठक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 2017 मध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर ही तिसरी बैठक होणार आहे. भारत, चीन सीमेवर मागील सहा महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. तर दुसरीकडे चीनने दक्षिण चायना समुद्रात आगळीक केल्याने चीनच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्याची गरज अमेरिकेलाही वाटत आहे. त्यामुळे संरक्षण विषयक महत्त्वाचे करार या बैठकीत भारतासोबत होऊ शकतात.

यासंदर्भात हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन देशांमध्ये बेसिक एक्सचेंज अँँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट नावाचा करार होणार आहे. भारताला पिन पॉइंटेड हल्ल्यांसाठी आवश्यक स्थानिक डेटा पुरवणारा एमक्यू-9बी ड्रोनसारखी संरक्षणविषयक मदत यातून मिळणार आहे. 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीमुळे ट्रम्प यांना फायदा होऊ शकतो.