भारताचा न्यूझीलंडवर ९० धावांनी मोठा विजय 

माऊंट माउंगानुई : वृत्तसंस्था – भारताने दिलेले ३२५ धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलविले गेले नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव २३४ धावात आटोपला. भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी मात केली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मिळालेला हा विजय भारतांच्या आनंदात भर टाकणारा ठरला आहे.

भुवनेश्वरकुमार ने त्या तिसऱ्या षटकात मार्टिंनला चाहल करवी झेलबाद करुन न्यूझीलंडच्या फलदांजीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठराविक अंतराने न्यूझीलंडचे फलंदाज एकामागोमाग तंबूत परत गेले. त्यामुळे भारताची सामन्यावरील पकड मजबूत होत गेली. कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवत १० षटकात ४५ धावा देऊन महत्वाचे ४ बळी मिळविले.  त्याला चाहलने चांगली साथ देत ५२ धावात दोन बळी घेतले. तर भुवनेश्वरकुमार याने ४२ धावात २ बळी मिळविले.

धोनी, केदारची धुव्वाधार बॅटिंग ; न्यूझिलंड समोर मोठे आव्हान 

न्यूझीलंडकडून केवळ ब्रासवेलच अर्ध शतक करु शकला. त्याने ५७ धावा केल्या. भारताच्या फिरकीपुढे पुन्हा एकदा न्यूझीलंडचा डाव कोसळला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २ -० अशी आघाडी घेतली आहे.

अगोदर, रोहित शर्मा (८७) आणि शिखर धवन ( ६६) यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले. विराट कोहली (४३) व अंबाती रायुडू  (४७) यांनीही दमदार खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद ३२४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं ( ४८* ) फटकेबाजी करताना केदार जाधव (२२*) संघाला ३२४ धावांपर्यंत मजल मारून दिली होती.