#Surgicalstrike 2 : शहीद जवानाच्या आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

वाराणसी : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर आज भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. हवाई दलाच्या या कारवाईनंतर देशभरात आनंद व्यक्त होत असतानाच , पुलवामामध्ये शहीद झालेल्या रमेश यादव यांच्या आईने देखील वायुसेनेचे अभिनंदन केले आहे. शहीद यादव यांच्या वीरपत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाईदलाचे आभार मानले आहेत. तर शहिदाच्या आईने आणखी दहशतवाद्यांना मारा अशी भावना व्यक्त केली आहे. ज्या डोळ्यांमध्ये १३ दिवस आश्रू होते त्याच डोळ्यात आज आनंदाश्रू पहायला मिळाले.

शहीद रमेश यादव हे वाराणसीचे जवान होते. ते सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले होते. या हल्ल्याच्या १३ दिवसांनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी आज पहाटे बालाकोटमध्ये शिरून २१ मिनिटांत १००० किलोचे बॉम्ब फेकून जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते . आणि ही कामगिरी यादव कुटुंबीयांसाठी सुखाचे किरण घेऊन आली. मुलगा, पती गमावल्याचं दुःख कायमच राहील, पण त्यांच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. पाकिस्तानात लपलेल्या एकेका दहशतवाद्याला शोधून मारा, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

तसेच, शहीद विजय मौर्य यांच्या भावानेही लष्कराची पाठ थोपटली. भारतावर हल्ला करण्याची जैश दहशतवाद्यांची हिंमत होणार नाही, या दृष्टीने पाकिस्तानवर दबाव कायम ठेवा, अशी आग्रही सूचना त्यांनी केली.