देशातील 2 शास्त्रज्ञांनी बनवला खास ‘खादीचा’ मास्क, किंमत फक्त 10 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. कोविड 19 ची औषध आणि लस उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी फेस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. दरम्यान, भारताच्या अवकाश एजन्सी इस्त्रोचा भाग असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये काम करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांनी विशिष्ट प्रकारचा खादीचा मास्क बनवला आहे. या मास्कची किंमत फक्त 10 रुपये आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे मास्क फिल्टरिंगला कमकुवत करेल आणि सामान्य मास्क पेक्षा हे चांगले आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नवीन मास्कमध्ये दोन भाग आहेत. एक भाग नाकासाठी आहे आणि दुसरा भार तोंडासाठी आहे. हे दोन्ही भाग एकमेकांशी जोडलेले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते नाक आणि तोंडासाठी वेगवेगळे भाग असल्यामुळे अधिक संरक्षण मिळते. पी. वेणुप्रसाद आणि डॉ. अनिता एस यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी कोणतेही पेटंट करण्याची आवश्यकता नाही. हे मास्क बनवण्याची माहिती फेसबुकवर उपलब्ध असून याची किंमत फक्त दहा रुपये आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे मास्क कोणताही टेलर सहज बनवू शकतो.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मास्कचा जो नाकाचा भाग आहे त्याला तारांच्या मदतीने शिवण्यात आला आहे. त्यामुळे ते कोणत्याही आकाराच्या नाकावर बसू शकते. हे मास्क अ‍ॅडजेस्ट होणाऱ्या इयर लूपच्या मदतीने बनवण्यात आले आहे. यामुळे हे मास्क कोणत्याही चेहऱ्यावर योग्य प्रकारे बसू शकते. हे मास्क खादीच्या कपड्यापासून बनवण्यात आल्याने ते अधिक काळ टिकू शकतात.

त्यांनी सांगितले की, बहुतेक सामान्य मास्कमध्ये फिल्टरींग क्षमता कमी असते आणि असे मास्क चेहऱ्यावर योग्य प्रकारे बसत नाहीत. हे मास्क घातल्यानंतर तोंडातून सोडलेली हवा डोळ्यापर्यंत जाते. डोळ्याचा दीर्घकाळ हवेशी संपर्क आल्याने डोळे कोरडे होण्याच्या समस्या वाढतात. हा मास्क आपल्या सर्व समस्या दूर करतो. हे मास्क धुतले जाऊ शकते आणि यामध्ये कपड्याचे तीन थर आहेत.