देशातील ‘टॉप 10’ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर, तेलंगणा 8 व्या नंबरवर तर महाराष्ट्राला नाही स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभर महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीविषयी लोकांमध्ये संताप उसळत आहे. लोक आता पोलिस प्रशासनाच्या कामावर प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्याचबरोबर आता गृह मंत्रालयाने चांगली कामगिरी बजावणाऱ्या देशातील पहिल्या दहा पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली आहे. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की गुन्हेगारीच्या बाबतीत नेहमी चर्चेत असणारे राज्य म्हणजे यूपी आणि बिहार यांपैकी कोणत्याही पोलिस स्टेशनचे नाव यादीमध्ये समाविष्ट नाही.

देशातील सर्वोत्कृष्ट कार्यरत पोलिस स्टेशनच्या यादीत अबेरदीन पोलिस ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. हे पोलीस स्टेशन अंदमान निकोबार द्वीप समूहात येते. राज्यनिहाय पाहिले तर अंदमान निकोबार बेटांनंतर दुसर्‍या क्रमांकावर गुजरात, तिसर्‍या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू, पाचव्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेश, सहाव्या क्रमांकावर दिल्ली, सातव्या क्रमांकावर राजस्थान, आठव्या स्थानी तेलंगाणा, नवव्या क्रमांकावर गोवा आणि दहाव्या क्रमांकावर पुन्हा एकदा मध्य प्रदेश आहे.

पोलिस स्टेशनच्या कामगिरीची पडताळणी तीन गोष्टींच्या आधारे करण्यात आली आहे. पहिले म्हणजे प्रॉपर्टी ऑफेंस म्हणजेच मालमत्ता संबंधित गुन्हे, दुसरे म्हणजे महिलांवरील गुन्हे आणि तिसरे म्हणजे समाजातील अत्याचारी घटकांवरील गुन्हे. ज्या पोलिस ठाण्यांमध्ये अशी प्रकरणे कमी आढळली आहेत त्यांना सर्वोत्तम पोलिस स्टेशन मानले जाते.

गेल्या एका आठवड्यापासून महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या आणि हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत पोलिस ठाण्याचे रँकिंग अनेक राज्यांमधील वाढते गुन्हे उघडकीस आणत आहे.

या सर्वेक्षणासाठी सर्व राज्यांमधून एकूण १५,५७९ पोलिस ठाण्यांची निवड केली गेली होती. या पोलिस ठाण्यांविषयी लोकांकडून अभिप्रायही घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सर्व राज्यांमधून तीन पोलिस ठाण्यांची निवड केली गेली. ज्यामध्ये जवळपास ७५० पोलिस ठाणे निवडली गेली. नंतर, दिल्ली आणि इतर सर्व राज्यांतून दोन पोलिस ठाण्यांची निवड झाली आणि अखेर केंद्र शासित प्रदेशांमधून एक-एक पोलीस ठाणे निवडले गेले होते. पुढील टप्प्यात एकूण ७९ पोलिस ठाण्यांची निवड झाली. शेवटच्या टप्प्यात एकूण १९ पोलिस ठाण्यांची निवड झाली.

Visit : Policenama.com