इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसने जनतेला मुर्ख बनवण्याचे काम केले – नरेंद्र मोदी

 तुमकुर (कर्नाटक) वृत्तसंस्था

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा कलगी तुरा चांगलाच रंगताना दिसत आहे. काॅंग्रेस व भाजप एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसातसा प्रचारही आक्रमक होत चालला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमकुर येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेस गेल्या अनेकवर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही केले नाही.

काॅंग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवून त्यांचा विकास करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता त्यांनी गरीब गरीब बोलणे बंद केले आहे. कारण आता लोकांनीच गरीब घरातील पंतप्रधान निवडला आहे असे मोदी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या कालावधीपासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांना शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.

कर्नाटकातील जनतेने काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांमधली आघाडी समजून घेतली पाहिजे. दोघेही आम्ही परस्परांच्या विरोधात लढत आहोत असे दाखवत आहेत. पण बंगळुरुमध्ये जेडीएसचा काँग्रेसच्या महापौराला पाठिंबा आहे असे मोदी तुमकुर येथील सभेत म्हणाले. निवडणुकीची तारीख जशी जवळ येतेय तसा प्रचार अधिक धारदार होत चालला आहे.