चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले – ‘संत व हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे ही त्यांची जुनी परंपरा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   अयोध्येतील श्री रामलल्लाचे मंदिर उभारणीसाठी अनेक राज्यातून निधी येत आहे. तर या निधीवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाद होताना दिसत आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका करत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिर निर्माणासाठी नव्हे तर एका राजकीय पक्षासाठी निधी गोळा करत असल्याचा आरोप केला आहे. तर राम मंदिरासाठी गोळा झालेला निधी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लुबाडला जाऊ शकतो असा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी दिला. या आरोपावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधत संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी परंपरा असे प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आरोप करत म्हणाले, मंदिर उभारणीच्या नावावर महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात येत आहे. मात्र ही सर्व रक्कम राम मंदिराच्या उभारणी करिता निर्माण करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये जमा होईल याची खबरदारी जनतेने घ्यावी. अन्यथा भाविकांची लूट होण्याची शक्यता आहे असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे. परंतु या आरोपावरून आता काँग्रेस- भाजप मध्ये मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल मला थोडेसेही आश्चर्य वाटले नाही. कारण, राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी १. ११ लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ११ चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं,असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला केला आहे.