राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘अंतर्गत’ वाद चव्हाटयावर आल्यानं जितेंद्र आव्हाड संतापले

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – भिवंडी तालुक्यातील महापोली येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जितेंद्र आव्हाड त्यांनी कार्यकर्त्यांच्या या नाट्यमय वादावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच आव्हाडांनी सल्लाही दिला की मला अंधारात ठेऊन काहीही करू नका.

या सत्कार समारंभात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ व राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे या दोघांमध्येच कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवरच ‘तू तू मै मै’ सुरु झाली होती. सुभाष पिसाळ हे सध्या प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहतात. परंतु राज्यात महाआघाडीची सत्ता आल्याने त्यांना आता ठाणे जिल्हा अध्यक्ष पद हवे आहे. सध्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दशरथ तिवरे विराजमान असून या पदाच्या मुद्द्यावरून या दोघांत ‘तू तू मै मै’झाल्याचे उघड झाले आहे.

हा वाद येवढ्यावरच न थांबता मंत्री जितेंद्र आव्हाड जेव्हा आपले अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आले, तेव्हा दशरथ तिवरे यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि माईक स्वतःच्या हातात घेऊन आपली भावना व्यक्त करत पिसाळांवर जाहीरपणे खोचक टीका केली.

या प्रकारामुळे आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि दुसऱ्याच्या कार्यक्रमात येऊन घाण करता कशाला, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या पिसाळांवर टीका केली. तसेच जिल्ह्याचे नेते कार्यकर्त्यांना देत नाहीत, तुमच्याकडे जे ऐश्वर्य आले आहे ते कार्यकर्त्यांचे देणे आहे. अशा तीव्र शब्दात त्यांनी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यावर देखील टीका केली आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला की पदासाठी कुणीही भांडू नका.

तसेच आव्हाडांनी प्रखर भाषेत गणेश नाईक यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की मागील पाच वर्षात राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडवला असेल तर त्याचे नाव गणेश नाईक आहे. गणेश नाईक यांच्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीला सोडून गेलेले भाजपचे सध्याचे भिवंडी लोकसभा खासदार कपील पाटील आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनाही धारेवर धरले.