IPL 2021 : आयपीएल टीम खरेदीसाठी अदानी ग्रुप उत्सुक, दुसर्‍या नव्या संघासाठी पुण्यासह 3 शहरांची चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन – इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामात मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक जेतेपद पटकावताना प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. १३ व्या हंगामाच्या यशस्वीतेनंतर बीसीसीआयने पुढील वर्षीच्या आयपीएलबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. संघांच्या लिलावावरून फ्रँचायझींमध्येही दोन गट पडले असून त्यावर बीसीसीआय डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निर्णय घेणार आहेत. दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामात दोन संघ वाढणार आहेत. त्यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असून या दोन संघांपैकी एका संघासाठी अदानी ग्रुप आग्रही असल्याचे वृत्त आहे.

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्सला (सीएसके) प्ले ऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे २०२१ च्या आयपीएलसाठी सीएसके ला नव्यानं संघबांधणी करायची आहे.

पुढील वर्षी एप्रिल-मे या कालावधीत भारतातच आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण, त्यात दोन संघांची भर पडण्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे. मागील वर्षीच अशी चर्चा रंगली होती. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे.

संजिव गोएंका ग्रुपनं २०१६ व २०१७ च्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

मेगा ऑक्शनबाबत मतभिन्नता
बीसीसीआयने मेगा ऑक्शन घेण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र याला फ्रँचायझींनी विरोध केला आहे. तर कहाणी सहमती दर्शवली आहे. बऱ्याच फ्रँचायझींनी त्यांची कोर टीम तयार केली आहे आणि त्या टीमलाच प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. जर लिलाव घेण्यात आला तर त्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. पण, लिलाव झाल्यास काही संघांना नव्यानं संघबांधणी करणे शक्य होईल आणि त्यामुळे त्यांचा या लिलावाला पाठींबा आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सीएसकेला फायदा
आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला अपेक्षित असे यश मिळाले नाही. हंगामांतील कामगिरी पाहता संघाची पुर्नरचना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मेगा ऑक्शन झाल्यास सर्वाधिक फायदा हा चेन्नई सुपर किंग्सला होईल. पुढील पर्वासाठी सीएसके संपूर्ण संघ बदलण्याची शक्यता आहे. शेन वॉटसननं निवृत्ती घेतली आहे, तर इम्रान ताहीर, पीयूष चावला, हरभजन सिंग, मुरली विजय, केदार जाधव यांना संघ रिलीज करू शकतो. त्यामुळे त्यांना ऑक्शनची गरज आहे.

अंतिम ११ मध्ये आता ५ परदेशी खेळाडू?
फ्रँचाझींना भारतीय खेळाडूंमध्ये स्पार्क सापडत नाही, त्यामुळे संघ संख्या वाढल्यास त्यांना क्वालिटी खेळाडू मिळवताना जड जाईल. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानी अंतिम ११ मधील परदेशी खेळाडूंची संख्या ५ करावी असा पर्याय सूचवला आहे.