IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करण्यासाठी घेतली होती परवानगी; पण ‘त्या’चा गैरवापर केला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या खंडणीच्या आरोपावरून पोलीस दलातील कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असतानाच यानंतर दुसरी गोष्ट फोन टॅपिंग प्रकरणात एक धक्कादाक माहिती पुढं आली आहे. IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांनी याचा गैरवापर केल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी रीतसर फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. परंतु, हे करत असताना IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचेही फोन टॅप केले आहेत. याबाबतचा आरोप काही मंत्र्यांनी केला आहे. यासंदर्भाचा सीएस आपला संपूर्ण अहवाल हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहेत.

तसेच, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप करत म्हटले होते की, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेता फोन टॅप केले होते. महाविकास आघाडी सरकार बनवण्याचे काम सुरू होते. रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या, त्या भाजपासाठी काम करत होत्या, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. या प्रकरणाची महाविकास आघाडी सरकारने गंभीर दखल घेतली असून चौकशी केली जाणार आहे. असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅप प्रकरणाचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेऊन CBI चौकशीची मागणी देखील केली होती.