Israel Embassy Blast : एकाच वेळी अनेक ठिकाणी ‘स्फोट’ करण्याचा होता ‘कट’, इटलीमध्ये इस्रायली दूतावासाशेजारी देखील सापडला बॉम्ब – सूत्र

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी राजधानी दिल्लीमध्ये इस्रायल दूतावासाच्या बाहेर झालेल्या स्फोटा (Israel Embassy Blast) नंतर अनेक प्रकारची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की हा हल्ला अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की हा एक कोऑर्डिनेटेड हल्ल्याचा प्रयत्न होता, म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी हल्ला करण्याचा कट होता. त्याचा खरा हेतू म्हणजे भय निर्माण करणे हा होता. खरं तर, ज्या दिवशी दिल्लीतील दूतावासाच्या बाहेर हा स्फोट झाला त्याच दिवशी इटलीमध्ये देखील इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर बॉम्ब सापडला.

दिल्लीत गेल्या 9 वर्षात दुसऱ्यांदा इस्त्रायली दूतावासाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला. 2012 मध्ये दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात इस्त्रायली मुत्सद्दी जखमी झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळीही दहशतवाद्यांनी दोन इस्रायली दूतावासांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या दिवशी इस्त्रायली मुत्सद्दीच्या गाडीवर हल्ला झाला होता, ठीक त्याच दिवशी जॉर्जियातील इस्रायली दूतावासाच्या बाहेर देखील बॉम्ब सापडला होता.

इस्त्रायली मुत्सद्दी तेल येहोशुआ आणि भारताचे वाहन चालक या स्फोटात जखमी झाले होते. हा एक मॅग्नेटिक स्फोट होता. त्यावेळीही इस्रायलने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले होते. आता पुन्हा एकदा हल्ल्याचा संशय इराणकडे जात आहे. विशेष म्हणजे या वेळीही दोन इस्रायली दूतावासांना लक्ष्य केले गेले आहे.

एक खास दिवस असल्याकारणाने करण्यात आला हल्ला

लक्षात घेण्यासारखे आहे की एक खास दिवस असल्याकारणाने हा हल्ला या दिवशी घडवून आणण्यात आला होता. भारत-इस्राईल मुत्सद्दी संबंधांच्या 29 व्या वर्धापनाच्या दिवशी हा हल्ला करण्यात आला. अशा परिस्थितीत या हल्ल्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दूतावासाशेजारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तातडीने तीन आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स देखील थांबविण्यात आल्या होत्या. कसून शोध घेतल्यानंतरच या फ्लाईट्सना जाण्यास परवानगी देण्यात आली होती. काही माहितीच्या आधारे या फ्लाईट्सची देखील चौकशी करण्यात आली होती.

आतापर्यंतच्या तपासात काय-काय सापडले

फॉरेन्सिक तपासणीत सध्या समोर आले आहे की स्फोटात पीईटीएन (PETN) चा वापर केला गेला. जगभरातील लष्करालाच फक्त याचा वापर करण्याची परवानगी आहे. तपासणीत एक ‘हाय-वॅट’ बॅटरीही सापडली आहे. 9 व्होल्टच्या या बॅटरीचा उपयोग सामान्यत: रेडिओ ट्रान्झिस्टरसाठी केला जातो, जेणेकरून स्फोटाच्या जागेवरुन संदेश पाठवता येतील. सूत्रांचे म्हणणे आहे की इस्लामिक स्टेट किंवा अल कायदाचा देखील यामध्ये हात असू शकतो.