‘वूमन्स डे’पेक्षा ‘ह्यूमन्स डे’ असला पाहिजे : पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

पुणे : वूमन्स डेपेक्षा ह्युमन्स डे ठेवला, तर महिला दिन किंवा इतर दिन साजरे करण्याची वेळ येणार नाही. महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे. कायद्याचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. अलीकडे कुटुंबांमध्ये अनेक प्रकारचे वाद होत असतात. मात्र, कुटुंबप्रमुखाबरोबर इतरांनीही एकमेकाला समजून घेतले, तर घटस्फोटासारखे प्रकार होणार नाहीत. महिला-मुली पुरुषांच्या बरोबरीने नोकरी-व्यवसाय करीत आहेत, ही बाब समाधानाची आहे, असे मत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केले.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नोबल हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नोबल हॉस्पिटलच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षका आर. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षिका मोहिनी डोंगरे, नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

नम्रता पाटील म्हणाल्या की, महिला दिन एक दिवसापुरता मर्यादित न राहता दररोज महिलांना समाजामध्ये महिलांना मान-सन्मान मिळाला पाहिजे. केवळ महिला दिन नव्हे, तर माणूस दिवस असला पाहिजे. स्त्री म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून पाहणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष समानतेपेक्षा तटस्थ भूमिकेतून महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी कर्तृत्वातून भरारी घेतली आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.