जय महाराष्ट्र ! कोरोना प्रतिबंध लसीकरणात Maharashtra देशात अग्रेसर; ओलांडला 2 कोटींचा टप्पा, CM कडून आरोग्यमंत्र्यांचं अभिनंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाचा सामना करणा-या महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी (दि.18) तब्बल 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

राज्यात सोमवारी (दि. 17) सुमारे 99, 699 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. राज्यात सोमवारी 26 हजार 616 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 516 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 60 हजारांच्या घरात गेली होती. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 रुग्ण उपचाराधिन आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 48,74, 582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.53 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासलेल्या 3 कोटी 13 लाख 38 हजार 407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.25 टक्के नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.